Coronavirus | मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुख्यमंत्री कोविड-19 सहाय्यता निधी मागील महिन्यात 28 मार्च रोजी खुला झाला होता.
मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक राज्य तसंच केंद्र सरकारला आर्थिक मदत करत आहेत. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत. एलआयसी गोल्डन जुबली फाऊंडेशनने गुरुवारी (16 एप्रिल) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत केली आणि. त्यामुळे निधीमधील जमा रक्कम 247 कोटींवर पोहोचली. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ साठी १ कोटी रुपयांची मदत. जनतेकडून मदतीच्या धनादेशासोबतच वस्तू, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदत. मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2020
कोरोना व्हायरसविरद्धच्या लढाईसाठी नागरिकांनी साथ देण्याचं आणि आर्थिक मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शक्य तेवढी मदत करा जेणेकरुन ही लढाई सोपी होईल. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने मदतीचे हात समोर आले. विद्यार्थी, तरुण वर्ग, वयोवृद्ध, खेळाडू, कलाकार, उद्योजक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक योगदान दिलं.
मुख्यमंत्री कोविड - 19 सहाय्यता निधी मागील महिन्यात 28 मार्च रोजी खुला झाला होता. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक प्रकारची मदत करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. यानंतर जवळपास 18-19 दिवसांत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत.
याशिवाय अदानी ग्रुप, मोतीलाल ओसवाल लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक अँड सेलो ग्रुप, शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, अजिंक्य रहाणे, विराट-अनुष्का, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अजय देवगण, वरुण धवन, शाहरुख खान यांसारख्या अनेक दिग्गजांनी, संस्थांनी विविध प्रकारची मदत केली आहे.