'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत, एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही.

बीड : मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात निकाल येण्यासाठी वर्ष उजडणार नाही असं वाटलं होतं, त्याच्या वल्गना मुख्यमंत्र्यांकडून झाल्या होत्या. एक वर्षाच्या आत या प्रकरणातील आरोपींना फासवर लटकू असा शब्द दिला होता. मात्र, या प्रकरणात दिरंगाई होत आहे. सरकार पक्षात अजितदादांचा एक आमदार आहे, त्यांनी एक टायर पंक्चर केलेलं आहे, तोच या प्रकरणात यंत्रणा चालवत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj jaragne) यांनी नाव न घेता पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे (Beed) यांना लक्ष्य केलं. हे प्रकरण भिजत गोंधळ ठेवायचं आहे का अशी शंका येत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत, एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही. आरोपी तातडीने फासावर गेल्याशिवाय आमचं समाधान नाही. परळीवाल्यांनी काही माणसं पेरुन ठेवले आहेत, त्यांनी काही माणसाला सांगितलं आहे की, आपला एक माणूस सुटणार असं बोला. हे परळीतल्या लोकांकडून बोलून घेतलं जात आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसेच, ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी हा जिल्हा पूर्ण बंद ठेवायचा, त्यानंतर राज्य बंद ठेवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. परळीवाला असं का घडवून आणतो हे सरकारने शोधलं पाहिजे, सरकार अडचणीत येण्याचे स्टेटमेंट तो का करतो हे बघितलं पाहिजे. मात्र, तू सुटणार नाही हे सत्य आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
कृष्णा आंधळे कुठे आहे, का सापडत नाही?
धन्यानीच हा सगळा प्रकार घडून आणला आहे, जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही कुणीही मागे हटणार नाहीत. ज्या दिवशी तो सुटेल त्या दिवशी राज्यात चाक देखील फिरणार नाही. आधी या प्रकरणाच्या तपासाचा वेग योग्य वाटत होता, कारण त्यावेळेस फडणवीस यांनी शब्द दिला होता. फडणवीस साहेबांच्या एका शब्दावर सगळे लोक शांत बसले होते. सरकार या प्रकरणात दबाव आणते काय बघितलं पाहिजे? क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतात कृष्णा आंधळे कुठे आहे? असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
पोलीस महासंचालकांसोबत कशाची बैठक झाली?
क्रूर हत्या करणारे सापडत नाहीत, तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? आंधळेने मारतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत, तो पकडला की या प्रकरणाचा मोठा उलगडा होईल. आज अधिवेशनात देशमुख प्रकरणाचा मुद्दा उचलला गेला आहे, इतकी क्रूर हत्या आहे. सरकारने हा विषय चार-पाच महिन्याच्या आत संपवावा. पुढे कुटुंबांनी हाक दिल्यास आम्ही कशाचा विचार करणार नाहीत. ओबीसीचे नेते कितीतरी आहेत त्यांना मोठे करा. अशा क्रूर लोकांना सांभाळत असाल तर आम्हाला अजित दादाचा राग येणार, तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ करत आहात. काल तर तो त्यांना घेऊन गेला, अजित पवार आणि त्याची बैठक झाली. पोलीस महासंचालकाची बैठक झाली, पण विकासाच्या कामात पोलीस महासंचालकाचे काय काम? काहीतरी शिजत आहे, फडणवीस तुम्ही याच्यात सहभागी होऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.























