(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोडरोमियोंचा बंदोबस्त करा अन्यथा शाळा बंद करु, मुख्याध्यापकांचा इशारा
मुलींच्या पाठीमागे ट्रिपल सीट गाडी चालवणारे रोडरोमिया सर्वत्र पाहायला मिळत आहेत. शाळेसमोर, कॉलेजसमोर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या विद्याथिनींना त्रास देण्याचे प्रकार सर्रास परभणीत घडत आहेत. याबाबत काही पालकांनी तर गुन्हे दाखल केले आहेत.
परभणी : परभणी शहरात रोडरोमियोंनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. शाळा,महाविद्यालय, ट्युशन्स आदी ठिकाणी थांबून विद्यार्थिनींना त्रास देण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. शाळेसमोर थांबू नका असे म्हणणाऱ्या एका मुख्याध्यापकाच्या अंगावर जात त्यांना रोडरोमियोंनी विट फेकून मारली होती. या घटनेमुळे रोडरोमियोंचा बंदोबस्त करा, अन्यथा शाळा बंद करु, असा इशारा 40 शाळांच्या मुख्याध्यपकांनी प्रशासनाला दिला आहे.
दहावी, बारावीची परीक्षा एका महिन्यावर आली आहे. त्यामुळे शाळांचे एक्स्ट्रा क्लासेस, ट्युशन आदी ठिकाणी जाण्यासाठी मुलींची संख्या वाढली आहे. मात्र या मुलींच्या पाठीमागे ट्रिपल सीट गाडी चालवणारे रोडरोमिया सर्वत्र पाहायला मिळत आहेत. शाळेसमोर, कॉलेजसमोर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या विद्याथिनींना त्रास देण्याचे प्रकार सर्रास परभणीत घडत आहेत.
याबाबत काही पालकांनी तर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र पोलिसांकडून अद्याप या रोडरोमियोंवर कारवाई झाली नाही. शहरातील भारतीय बाल विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आनंद देशमुख यांनी शाळेसमोरील असा रोडरोमियोंना हटकलं होतं. शाळेसमोर उभे राहू नका अस दम देशमुख यांनी रोडरोमियोंना भरला. मात्र संतापलेल्या रोडरोमियोंनी त्यांच्या अंगावर जात शिवीगाळ केली आणि त्यांना विट फेकून मारली.
त्यानंतर देशमुखांनी पोलिसात तक्रार केली. दरम्यान हा प्रकार शहरातील सर्वच शाळेत घडत असून तात्काळ या रोडरोमियोंना आवर घाला, अन्यथा आम्हाला शाळा बंद कराव्या लागतील असा इशारा 40 शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी मात्र बोलायला नकार दिला आहे.