"हमारे लोग सताते तो नहीं ना?" सोनिया गांधीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले...
कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : नैसर्गिक आपत्तीत राजकारण केलं जातंय पण ते क्लेशकारक आहे. कॅबिनेट काय असतं ते मला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर कळतंय, मला सर्वाचं सहकार्य लाभतंय. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. सोनियाजी फोन करून विचारतात काम कसं चाललय याची विचारपूस करतात. “हमारे लोग सताते तो नहीं ना?”असंही त्या विचारतात. मग मी तिथे तुमची (कॉंग्रेस) बाजू लावून धरतो आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त नाही, असे उत्तर देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम : शरद पवार
बघता बघता एक वर्ष पूर्ण केलं या एका वर्षात अनेक संकंट आली पण त्यातही हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याची कामगिरी केली. महाराष्ट्राच्या जनेतनं हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी हातभार लावला, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही, असेही शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :