(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सी फोर्ट सर्किट टूरिझम'च्या माध्यमातून जलदुर्ग जोडावेत, खासदार संभाजीराजे छत्रपतींची मागणी
जगातल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पोहचवण्यासाठी मुंबई आणि रायगड या दरम्यान समुद्रातील किल्ले एकमेकांना जोडण्यात यावीत अशी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मागणी केली.
पुणे: राज्याची राजधानी मुंबई आणि स्वराज्याची राजधानी रायगड यांना 'सी फोर्ट सर्किट टूरिझम'च्या माध्यमातून जोडण्यात यावे अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास जगभरात पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडशी जोडलं गेलं पाहिजे. हे 'सी फोर्ट सर्किट टूरिझम' म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून जोडायला हवं. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल."
कोल्हापूरचे छत्रपती घराणे शिवरायांच्या संबंधी कामाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिल्याचं सांगत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "शाहू महाराजांनी पुण्यात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा करायला सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. आता मला रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवरायांची सेवा करायला मिळतेय."
Shiv Jayanti 2021 : कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु, मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री ठाकरे
रायगड विकास प्राधिकरणाचे काम करताना कोणतेही राजकारण आड आणले नसल्याचे सांगत खासदार संभाजीराजे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून रायगड विकास प्राधिकरणाला 20 कोटी निधी देण्याचा पहिला निर्णय घेतला. गड-किल्ल्यावर येताच ते राजकीय भूमिका बाजूला ठेवतात आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटतात. आता आदित्य ठाकरे पर्यटक मंत्री म्हणून चांगलं काम करताहेत."
महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या वाढवायची असेल तर राज्य सरकारने सी फोर्ट टूरिझमची संकल्पना लवकरात लवकर सत्यात आणावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.