एक्स्प्लोर
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला अटक
येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केली आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आलं आणि याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सचिनकडून डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाले.
सचिन अंदुरेला कशी अटक करण्यात आली?
नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर प्रकरणाचे धागेदोरे मिळाले होते. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं आहे. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
जालन्यातूनही एकाला अटक
या प्रकरणात जालना जिल्ह्यातूनही एकाला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकर असं जालन्यात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
शरद कळसकर कोण आहे?
शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण
येत्या 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement