भजन, घंटानाद, उपोषण; मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असली तरी देवाची दारं अजूनही बंदच आहेत. मंदिराची दारं खुली करण्यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. "मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार" अशा घोषणांसह विविध ठिकाणी भजन, घंटानाद आणि उपोषण केलं जात आहे.
मुंबई : अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात राज्यभरात आज भाजपने मंदिर उघडा आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते आंदोलन करणार आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर घंटनाद भाजपने आज सकाळी 11 वाजता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दारात घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले.
पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर वाद्यांचा गजर करत आंदोलन पुण्यात शहर भाजपच्या वतीने आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. शहराचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर विविध वाद्यांचा गजर करत हे आंदोलन करण्यात आलं. कुंभकर्णासारख्या गाढ झोपलेल्या सरकारला प्रतिकात्मक जागे करण्याचा प्रयत्न असल्याने यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या.
सांगलीत टाळ-मृदंग वाजवून सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन सांगलीत भाजपाच्या अध्यामिका आघाडीच्या वतीने आज सकाळी दहा वाजता गणपती मंदिरासमोर टाळ-मृदंग वाजवून सरकारला जागे करण्यासाठी कीर्तनकार, भक्तमंडळी, वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार सहभागी झाले आहेत.
कोल्हापुरातील शेष नारायण मंदिरबाहेर निदर्शने हॉटेल, बार, मॉल सुरु केले असले तरी मंदिर बंद ठेवल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या वतीने आज कोल्हापुरातील शेष नारायण मंदिराबाहेर निदर्शनं केली जात आहे.
सोलापुरात मल्लिकार्जुन मंदिराजवळ आंदोलन राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावी या मागणीसाठी भाजपतर्फे सोलापुरात आंदोलन होत आहे. याआधीही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापुरात आंदोलन झाली आहेत. आज बळीवेस परिसरातील मल्लिकार्जुन मंदिर इथे भाजपतर्फे आंदोलन होणार आहे.
परभणीत 50 मंदिरांमध्ये आंदोलन परभणीतही धार्मिक स्थळ सुरु करण्यासाठी आज भाजपचं आंदोलन होत आहे. जिल्ह्याभरातील धार्मिक स्थळ सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्याभरातील आज 50 मंदिरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
पंढरपुरात नामदेव पायरीसमोर आंदोलन मंदिरं उघडण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नामदेव पायरीसमोर आज भाजपचं आंदोलन आहे.
मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार, नागपुरात घोषणा नागपुरातही भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केलं. वर्धा रोडवरील प्रसिद्ध साई मंदिरासमोर सकाळपासून आंदोलन करण्यात आलं. "मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार " या घोषणेसह झालेल्या आंदोलनात भाजपचे अनेक नेते सहभागी झाले. साई मंदिरासमोर सकाळी 10 वाजता सुरु झालेले हे आंदोलन एक तास सुरु होते. एका तासात भाजप नेत्यांनी सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी घंटा आणि टाळ वाजवत आंदोलन केले. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात झाले. मंदिरांमधून अनेक कुटुंबांचे रोजगार असून त्यांची उपासमार होत आहे, लोकं नैराश्यात जात आहेत. त्यामुळे नवरात्रपूर्वी मंदिरे उघडा नाही तर आज भजन कीर्तनच्या माध्यमाने सुरू असलेले आंदोलन उद्या तीव्र करत रस्त्यावर आणू, असा इशारा भाजपने दिला आहे.