BLOG : 'इथेच टाका तंबू' म्हणजे दत्ता पाटील-सचिन शिंदेंचा 'मास्तर'स्ट्रोक

BLOG : लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे या नाशिककर जोडीचं 'इथेच टाका तंबू' हे दोन अंकी प्रायोगिक नाटक आधी ‘नाट्यरतन’ आणि महिन्याभरात काळा घोडा महोत्सवात पुन्हा पाहण्याचा योग आला. 'इथंच टाका तंबू' हे नाटक म्हणजे केवळ 'मास्तर'स्ट्रोक आहे. होय, 'मास्तर'स्ट्रोक. कारण नाटकाची गोष्ट अजिबात सांगायची नाही म्हणून खरं तर हा एवढाच अभिप्राय.
आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एखाद्या बातमीचा सुगावा लागणं हे ऑन फिल्ड रिपोर्टरचं कौशल्य असतं, पण त्या बातमीचा चहूअंगांनी मागोवा घेता येणं संपादकीय डेस्कला असणारं जगाचं भान दाखवून देतं. नाटककार दत्ता पाटील हे तर हाडाचे पत्रकार आहेत. त्यामुळंच त्यांनी बातमीमागच्या बातमीचा इतक्या उत्तम पद्धतीनं मागोवा घेतलाय की, त्यांच्यामधलं सामाजिक आणि राजकीय भान प्रकर्षानं दिसून येतं. दत्ता पाटलांना हे नाटक लिहिण्यासाठी मिळालेली प्रेरणा किंवा नाटकामागची संकल्पना म्हटलं तर अगदी एका ओळीची आहे. पण ज्या विलक्षण घटनेनं त्यांना हे नाटक लिहिण्याची प्रेरणा दिली त्या घटनेवर आणि त्या घटनेमागच्या दिवंगत नायकावर सखोल रिसर्च करून त्यांनी या नाटकाची गोष्ट लिहिलीय.
दत्ता पाटलांनी सांगितलेली ही गोष्ट दिग्दर्शक सचिन शिंदेंनी रंगभूमीवर छान बांधलीय. या लेखक-दिग्दर्शक जोडीचं टीमवर्क किंवा परस्परसामंजस्य किती उत्तम आहे, याचा अनुभव त्यांची हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, कलगीतुरा आणि दगड आणि माती ही प्रायोगिक नाटकं स्वतंत्र किंवा नाट्यचौफुला या उपक्रमात एकत्र पाहिली असतील, त्या प्रेक्षकांना नक्कीच असेल. ही चारही नाटकं राज्यातल्या शेतकऱ्यांची वेदना सांगणारी किंवा ग्रामीण जीवनशैलीशी नातं सांगणारी आहेत. त्या तुलनेत दत्ता पाटलांचं 'इथेच टाका तंबू' हे नाटक वेगळी वाट चोखाळणारं असलं तरी हेही नाटक प्रेक्षकांना आपल्या जागी खिळवून ठेवणारंय. त्यांच्यासारख्या प्रतिभावान आणि रिसर्चसाठी मेहनत घेण्याची तयारी असलेल्या नाटककाराला एका विलक्षण घटनेतून मिळालेला छोटासा ‘जर्म’ही त्यातून नाट्य फुलवण्यासाठी पुरेसा ठरलाय.
दत्ता पाटलांची भाषा म्हटली तर सोपीय, पण त्या भाषेचं वळण दर्जेदार साहित्य निर्माण करणारंय. त्यांच्या भाषेत एक जिवंतपणा आहे. त्यात रोजच्या जगण्यातली उदाहरणं पेरण्याची किंवा सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर चटकदार भाष्य करण्याची त्यांची पद्धत ही नाट्यरसिकांना भावणारीय. दत्ता पाटील यांनी गोष्ट लिहावी, ती सजवावी, मग सचिन शिंदेंनी ती रंगभूमीवर नेटकेपणानं मांडावी आणि त्या नाट्यातून तुम्हाआम्हा रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव मिळावा ही प्रायोगिक रंगभूमीवर आता नित्याची बाब झालीय. साहजिकच त्या दोघांवरचं अपेक्षांचं ओझंही आणखी वाढणार आहे. त्यामुळंच ठाण्यातल्या पहिल्या ‘नाट्यचौफुला’च्या व्यासपीठावर प्रशांत दळवी-चंद्रकांत कुलकर्णी या प्रतिभावान लेखक-दिग्दर्शकांच्या जोडीनंतर मराठी रंगभूमीला लाभलेली अपेक्षा उंचावणारी लेखक-दिग्दर्शकाची जोडी म्हणून दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांचा ज्येष्ठ रंगकर्मींकडून गौरव झाला होता.
आम्हा पत्रकारांसाठी एखाद्या बातमीचा सुगावा लागणं हे जितकं महत्त्वाचं असतं ना, तितकंच त्या मोठ्या बातमीचा मागोवा घेणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्यातूनच बातमीमागची बातमी किंवा मूळ बातमीचे अनेक पदर उलगडून सांगता येतात. मूळच्या पत्रकार दत्ता पाटलांनी 'इथेच टाका तंबू'त एका विलक्षण घटनेवर सखोल रिसर्च करून त्यातल्या एका बातमीवजा गोष्टीमागचे सामाजिक पदर उलगडून सांगितलेयत. त्यांनी या नाटकातल्या चारही व्यक्तिरेखांना दिलेल्या संवादांमधून कधी टोकदार आणि परखड, कधी ओठांवर हसू फुलवणारं तर कधी डोळ्यांमध्ये नकळत पाणी आणणारं भाष्य केलंय. त्यामुळं 'इथेच टाका तंबू' हे नाटक पाहताना एक माणूस आपण त्या नाटकाशी कनेक्ट होतो.
ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, अमेय बर्वे आणि उमेश जगताप यांच्या कसदार अभिनयानं हा नाट्यानुभव खऱ्या अर्थानं अविस्मरणीय केलाय. पण या नाटकात गीता आणि हवालदार देशमुख या दोन व्यक्तिरेखांना व्यक्त होण्याची तुलनेत अधिक संधी लाभलीय. त्यामुळं प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अधिक जबाबदारी साहजिकच त्या दोन व्यक्तिरेखांवर अधिक येते. तरुण अभिनेत्री अश्विनी कासारनं गीताच्या, तर अनुभवी उमेश जगतापांनी हवालदार देशमुखच्या भूमिकेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. अश्विनी कासार आणि उमेश जगतापांना लेखकाकडूनच जास्त स्ट्राईक मिळाला असला तरी ओंकार गोवर्धन आणि अमेय बर्वे यांनीही अधूनमधून स्ट्राईकची मिळालेली संधी त्या त्या वेळी सार्थकी लावलीय.
अश्विनीसोबत गोवर्धनच्या भूमिकेत ओंकार गोवर्धन आहे, तर उमेश जगतापांसोबत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत अमेय बर्वे आहे. 'तो राजहंस एक'नंतर अमेय बर्वेची प्रायोगिक रंगभूमीवर आणखी एक चांगली भूमिका पाहायला मिळते. दगड आणि माती, साठेचं काय करायचं ही नाटकं गाजवणारी ओंकार आणि अश्विनी ही जोडी इथंही आपलं काम चोख बजावते. ‘दगड आणि माती’त त्वेषानं, संतापानं, अधिक प्रभावीपणे व्यक्त होणारा ओंकार गोवर्धन 'इथेच टाका तंबू'मध्ये गोष्टीच्या मागणीनुसार गीताच्या व्यक्तिरेखेला अधिक स्ट्राईक देतो. अश्विनी कासारनं गीताच्या त्या भूमिकेत एका सर्वसामान्य गृहिणीच्या रोजच्या जगण्याविषयी असलेल्या छोट्या छोट्या अपेक्षा बोलून दाखवताना, तिच्या भावभावना पोटतिडकीनं व्यक्त केल्या आहेत. अश्विनीचं स्फुंदून स्फुंदून रडणं तर तिच्या या नाटकात व्यक्त होण्याचा परमोच्च बिंदू ठरावा.
उमेश जगतापांना तर 'उणे पुणे शहर एक'पासून पाहतोय. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी पाहिली की त्यांच्यातला अभिनेता जणू एका पैलवानाच्या अविर्भावात शड्डू ठोकून भूमिकेच्या आव्हानाला सामोरं जात असावा, असंच वाटतं. उमेश जगतापांची त्यांच्या भूमिकेवरची पकड इतकी घट्ट असते की, त्या व्यक्तिरेखेत वास्तवातील उमेश जगताप फक्त चेहऱ्यानं जाणवत राहतात. हे चारही कलावंत दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्या भरवंशाच्या टीमचे घटक का आहेत, या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याही परफॉर्मन्समधून मिळतं. त्यामुळं 'इथंच टाका तंबू' पाहण्याची संधी मिळाली तर ती अजिबात दवडायची नाही.

























