(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2024 मध्ये भाजपची 240 जागा लढवण्याची तयारी, शिंदेंकडे फक्त 50 जागा : चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 48 जागा येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Chandrashekhar Bawankule : 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गास संबोधित करत होते. यावेळी बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 48 जागा येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं. भाजप शिंदे गटाव्यतिरिक्त असलेले मित्रपक्ष आणि अपक्षांनाही काही जागा सोडणार आहेत. शिंदे गटाचे सध्या 40 आमदार असून काही अपक्ष आमदारही त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा वगळता भाजप शिंदे गटासाठी जादा जागा सोडणार नाही, असे बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
2024 ला भाजपा 240 जागा लढणार...- pic.twitter.com/2sG3ebWiiT
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) March 17, 2023
भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गास संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणूक तयारीबाबतचे विश्लेषण केले. उपस्थितांना आगामी निवडणुकीच्या तयारी करण्याचा सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले की, विधानसभेत भाजपचे सध्या 105 सदस्य आहेत. तसेच आठ अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. 60 मतदारसंघ असे आहेत की, त्यात भाजपची काही वेळ हार झाली आहे किंवा विजय झाला आहे. असे धरुन या जागांची संख्या 173 होते. त्यापैकी शिंदे गटाकडे असलेले 12 मतदारसंघ सोडले तरी अन्य मतदारसंघात भाजपला जिंकण्यासाठी आणखी 8 टक्के मते हवी आहेत. भाजपकडे 43 टक्के मते असून आपल्याला 51 टक्के मते मिळवायची आहेत. रात्रंदिवस काम करून निवडणुकीच्या तयारीला लागावे. डिसेंबर 2023 पासून तुम्हाला रात्रंदिवस काम करावे लागेल. त्यासाठी आताच तयारीला लागा...
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पडलेली ही सर्वात मोठी फूट आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेवर दावा केला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
ऐन उन्हाळ्यात शिमल्यासारखी स्थिती, अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान