BJP Agitation for OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक, राज्यभर आक्रोश आंदोलन
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्यामुळे आज राज्यभर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता भाजपच्या ओबीसी आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राज्यभर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे. तर राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झालं आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे. दरम्यान मुंबईत भाजप आंदोलन करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं
जळगाव
भाजपच्या वतीने ठाकरे सरकारच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जळगावातही भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'आरक्षणासंदर्भात न्यायालयात प्रभावी बाजू न मांडणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध असो', 'उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो', अशा प्रकारच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला होता. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आक्रोश आंदोलनात भाजपचे आमदार, शहराध्यक्ष, ओबीसी आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी या गाढव सरकारचं खाली मुंडकं, वर पाय असे लिहलेलं आक्षेपार्ह पोस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली. शिवाय या आंदोलनात ओबीसी समाजातील वेगवेगळ्या घटकातील, जातीतील व्यक्तींनी पारंपारिक पद्धतीने हे आंदोलन करीत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण न्यायालयात रद्द होण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असून राज्य सरकारने व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे ही परिस्थिती आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे आंदोलन करताना मात्र कोरोना महामारीच्या काळात लावण्यात आलेल्या नियमांचा पुरता फज्जा उडाला होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं नसल्यानं कोरोनाचा धोका वाढण्याची भिती पोलिसांनी व्यक्त केलीय. जोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत लढाई लढणार असा इशारा भाजपने त्यांनी यावेळी दिला.
चंद्रपूर
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा निषेध म्हणून भाजपकडून आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. भाजपच्या मते ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकिय आरक्षण संपुष्टात आले आहे. न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल करण्यात आली. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती असा आरोप भाजप कडून करण्यात आली आहे. मात्र स्वतः काहीही करायचे नाही आणि फक्त केंद्र सरकार ला दोष द्यायचा हेच ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप आंदोलनात सहभागी भाजप नेत्यांनी केलाय.
अहमदनगर
अहमदनगर येथे देखील भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या भाजप नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण त्याना परत मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वर्ध्यात भाजपच आक्रोश आंदोलन
वर्ध्यात भाजपच्या ओबीसी सेलच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं.ओबीसीच राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपन आक्रोश आंदोलन केलं. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपन केलाय. खासदार रामदास तडस , आमदार दादाराव केचे , आमदार रामदास आंबटकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय गाते यांची यावेळी उपस्थिती होती. आंदोलनात सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मालेगाव
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चातर्फे राज्याचे उपाध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.राज्य शासनाने कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून योग्य बाजू मांडून ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
कल्याणात भाजपाकडून राज्य सरकारचा निषेध
कल्याणमध्ये भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेमुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकार्यानी केला भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज हे आंदोलन करावे लागत असल्याची खंत देखील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.