Beed : परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला यापुढे बांबूचा आधार! कोळशासोबत 10 टक्के जैवइंधन वापरण्यास परवानगी
Parli Thermal Power : परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला कोळशासोबत 10 टक्के जैवइंधन वापरण्यास परवानगी मिळाली आहे.
बीड : कोळशापासून तयार करण्यात येत असलेल्या वीज निर्मिती केंद्रासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा कोळशाच्या उपलब्धतेचा असतो. आता याच कोळशाला पर्याय म्हणून यापुढे आता बांबूचा उपयोग केला जाणार आहे. परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला कोळशासोबत 10 टक्के जैवइंधन वापरण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून परळीच्या या औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यामध्ये चार औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहेत ज्यातून राज्याला लागणारी वीज पुरवली जाते. कोळशापासून तयार होणारी ही वीज एकतर महागडी आहे तर दुसरीकडे या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला लागणारा कोळसा आणणे मोठे जिकरीचे बनले आहे.
पावसाळ्यात एक तर खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे तिथून कोळसा बाहेर काढणे अवघड होते. त्यातच रस्त्यात आणताना हा कोळसा ओला झाला तर पुन्हा कोळसा जाळण्यासाठी सुद्धा मोठे प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच बांबूचा वापर इंधन म्हणून करता आला तर त्याचा फायदा अशा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला होऊ शकतो.
संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पाला लागणारा कोळसा हा ठराविक ठिकाणावरून पुरवावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस कोळशाच्या वाढलेल्या किमतीमुळे वीज सुद्धा महागडी झाली आहे. शेतामध्ये सहज उपलब्ध होणारे गवत आणि पिकांचे काड जर इंधन म्हणून वापरता आले तर याचा फायदा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला मिळू शकेल ज्यातून विजेची किमतीही कमी होऊ शकेल.
ज्या काळामध्ये कोळसा सहज उपलब्ध होत होता त्या काळामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती ही कोळशापासून केली जायची. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये कोळशाच्या कमतरतेमुळे पाणी आणि गॅस पासून होणारी वीज निर्मिती वाढली आहे. मात्र कोळसा ऐवजी बांबूपासून वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली तर याचा फायदा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :