भिंत अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, बीडमधील माजलगामधील घटना
Beed News : भिंत अंगावर पडून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सय्यद इक्रा सय्यद निसार असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
Beed News Update : भिंत अंगावर पडून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सय्यद इक्रा सय्यद निसार असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईद निमित्त नगरपालिकेकडून माजलगाव शहरांमध्ये मशिद परिसराची स्वच्छता चालू असताना जेसीबीकडून भिंत पडली. या भिंतीखाली गुदमरून सय्यद हिचा मृत्यू झाला. या घटनेने माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजलगाव शहरात इदगा मोहल्ला आहे. याच मोहल्ल्यात एक मोठी मशिद आहे. या मशिद परिसरात स्वच्छता करण्यात येत होती. यावेळी स्वच्छतेसाठी आणलेला नगरपालिकेचा जेसीबी परिसरात जात नसताना देखील जबरदस्तीने आतमध्ये घालण्यात आला.
जेसीबी मशिदीसमोरील भागातील भिंतीजवळ गेली असता धक्का लागून भिंत कोसळली. यावेळी सय्यद या परिसरातून जात होती. ही भिंत तिच्या अंगावर कोसळली. सय्यद भिंतीखाली दबल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने जेसीबीने तिच्या अंगावरील भिंत बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी जेसीबीच्या खोऱ्यामुळे ती जखमी झाली. काही वेळातच तिला भिंतीखालून बाहेर काढण्यात आले. परंतु, तोपर्यंत गुदमरून तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी या जेसीबीवर दगडफेक करत चालकावर कारवाई करण्याची मागणी केली. संतप्त नागरिकांनी जेसबीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर चालक जेसीबी तेथेच सोडून पळून गेला. या जेसीबीचा चालक नवीन होता. त्यामुळेच त्याच्याकडून ही घटना घडल्याचे परिसरातून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी! अद्याप टँकरचा एकही प्रस्ताव नाही, मुबलक पाणीसाठा शिल्लक
- 1600 किलोमीटर पाठलाग करून बीड पोलिसांनी कुख्यात चैन चोरांच्या मुसक्या आवळल्या
- एका पॉलिथिन आणि थर्मोकोलच्या काही तुकड्यांवरून बस कंडक्टरच्या हत्येचा उलगडा, संशयितांना अटक