जायकवाडीच्या पाण्यासाठी संघर्ष! 140 गावातील शेतकरी आक्रमक, बीडमध्ये महायुतीच्या जाहिरनाम्याची होळी
बीड (Beed) जिल्ह्यातील 140 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जायकवाडी धरणाचे पाणी (Jaikwadi Dam Water) शेतीला मिळावे, या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे.

Beed : बीड (Beed) जिल्ह्यातील 140 गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जायकवाडी धरणाचे पाणी (Jaikwadi Dam Water) शेतीला मिळावे, या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांनी महायुतीच्या जाहिरनाम्याची होळी केली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विमानतळ नको, पाणी द्या, असा टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं.
मागण्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
गेल्या चार दिवसापासून अजय पाटील साळुंके हे उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ एकत्रित आले आहेत. जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी शेतीला मिळावे. यासाठी वर्षभरापासून 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरु केले आहे. यासह शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प या मागण्याही शेतकऱ्यांच्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आज तांदळा येथे महायुती सरकारच्या जाहिरनाम्याची होळी केली. या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
जायकवाडी हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती जायकवाडी धरणाची आहे. या धरणाचा आराखडा सर्वात पहिल्यांदा जुन्या हैदराबाद राज्याने तयार केला होता. तत्कालीन बीड जिल्ह्यातील ‘जयकुचीवाडी’ या खेड्याजवळ गोदावरी नदीवर 2,147 दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेलं धरण बांधण्याची योजना होती. अर्थातच जयकुचीवाडी या खेड्याच्या नावावरून प्रकल्पाला जायकवाडी हे नाव देण्यात आलं. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर आणि विविध पर्यायी जागांचा अभ्यास केल्यानंतर हे धरण जयकुचीवाडीऐवजी वरील बाजूस असलेल्या पैठण येथे बांधायचे निश्चित झाले. ठिकाण बदलले तरीही प्रकल्पाचे नाव तेच ठेवण्यात आले. हे धरण बांधण्यासंबंधीचा प्रकल्प अहवाल 1964 मध्ये पूर्ण झाला. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शेतीसाठी जमीन बागायती करणे हा धरण बांधण्यामागील मुख्य हेतू होता. तसेच जवळपासची शहरे आणि खेड्यांना, औरंगाबाद व जालना नगरपालिका व औद्योगिक क्षेत्राला पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणे हाही उद्देश होता. जायकवाडी धरणाचा पाया तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 18 ऑक्टोबर 1965 रोजी घातला होता. धरणाच्या उद्घाटनाचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 फेब्रुवारी 1976 रोजी केले होते. धरणातील 80% पाणी सिंचनासाठी, 5-7% पिण्याच्या पाण्यासाठी आणि उर्वरित औद्योगिक कामांसाठी दिले गेले आहे. धरणातून सरासरी दररोज सुमारे 1.36 एमसीएम स्त्राव होत असून त्यापैकी 0.05 एमसीएम पाणी एमआयडीसी क्षेत्राला दिले जाते, तर औरंगाबादच्या गरजा भागविण्यासाठी 0.55 एमसीएम वाटप केले जाते, तर उर्वरित रक्कम बाष्पीभवनात हरवते.
महत्वाच्या बातम्या:























