एक्स्प्लोर
माझा इफेक्ट : जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद : ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर जायकवाडीच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, जेसीबी आणि खोदकामाचं साहित्य काही जप्त केलं गेलं नाही. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. काल जायकवाडीच्या धरणात 15 जेसीबी होते. आज मात्र सगळे जेसीबी गायब झाले आहेत. त्यामुळे दोषींवर फक्त गुन्हा दाखल करुन चालणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. जायकवाडीचं पाणी चोरण्यासाठी गेल्या 15 दिवसात 30 फूट खोल आणि एक किलोमीटर लांब चर खोदण्यात आली आहे. याप्रकरणी ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर सुभाष सिसोदे, लक्ष्मण नेहे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. पण खोदकामाचं साहित्य जप्त का केलं नाही, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. शिवाय, ज्या ठिकाणी जायकवाडी धरणाचं खोदकाम केलं आहे. ते पुन्हा बुजवणं आवश्यक आहे. तसं केलं नाही तर पुन्हा एकदा या पाण्यावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणात फक्त गुन्हे दाखल करुन चालणार नाही तर दोषींना जरब अशी कारवाई करणंही आवश्यक आहे.
आणखी वाचा























