(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-वर्सोवा आणि वर्सोवा-विरार सागरी सेतू महत्त्वाचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुखकर प्रवास होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुखकर प्रवास होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असून त्यांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
वांद्रे वर्सोवा हा सी लिंक हा 9.6 किमी असून या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. हा सागरी महामार्ग सन 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
वर्सोवा-विरार या 42.75 किमी लांबीच्या सागरी मार्गाच्या पूर्व सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.
हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरण विषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला असूनमच्छिमारांच्या हालचालींना हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छिमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.