(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दत्ता सामंत ते प्रमोद महाजन, बाबा सिद्दिकींच्या आधी राज्यातील अशा दोन हत्या ज्याने अख्खा देश ढवळून निघाला!
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांच्याआधी महाराष्ट्रात दोन बड्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या झालेली आहे. या दोन्ही नेत्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अवघ्या 19 आणि 23 वर्षांच्या तरण्या पोरांनी सिद्दिकी यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार केला. या गोळीबारात एकूण तिघांचा समावेश होता. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसऱ्या शिवा नावाच्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्याआधी दोन बड्या नेत्यांची हत्या
बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव होतं. बॉलिवुड विश्वात त्यांचं चांगलंच वजन होतं. एवढ्या मोठ्या नेत्याची भर रस्त्यात हत्या झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील इतर राज्यांपैकी सर्वाधिक सुसंस्कृत राज्य आहे, असं म्हटलं जातं. मात्र इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणालाही रक्तपात चुकलेला नाही. इतिहासात डोकवल्यास लक्षात येईल की बाबा सिद्दिकी यांच्याआधीही महाराष्ट्र अनेक राजकीय नेत्यांच्या हत्यांमुळे भळभळलेला आहे. याआधी कामगार नेते डॉ. दत्ता सामंत (Datta Samant Murder Case) आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan Murder Case) या दिग्गजांची हत्या झालेली आहे.
डॉ. दत्ता सामंत धडाडीचे कामगार नेते
डॉक्टर दत्ता सामंत हे त्यांच्या काळातील धडाडीचे कामगार नेते होते. कामगारांच्या हिताचं एखादं काम हातात घेतल्यावर ते कधीच मागे सरत नसत. 16 जानेवारी 1997 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर एक-दोन नव्हे तर तब्बल 17 गोळ्या झाडल्या होत्या. दत्ता सामंत यांनी त्या काळी मुंबईत गिरणी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले होते.
कार्यालयाकडे जात असताना अज्ञातांकडून गोळीबार
मुंबईतील कामगारांचे ते नेतृत्त्व करायचे. 1982 साली गिरणी कामगारांच्या झालेल्या अभूतपूर्व संपाचे त्यांनीच नेतृत्त्व केलेले होते. पवईहून ते पतंगनगर येथील कार्यालयात जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांचा ड्रायव्हर भीमराव सोनकांबळे जखमी झाले होते. दत्ता सामंत यांच्यावर एकूण चार जणांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
आमदार, खासदारकी भूषवली
दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरणी कामगारांचे नेतृत्त्व करत त्या काळी कामगारांचे अनेक प्रश्न धसास लावले. पुढे राजकाणात आल्यानंतर ते आमदार, खासदारही झाले. 1972 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर मुलूंड या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर 1980 साली कुर्ला येथून अपक्ष उभे राहात त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. 1984 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा लढवली होती. विशेष म्हणजे ते या निवडणुकीत विजयी झाले होते.
प्रमोद महाजन यांची भावानेच केली हत्या
दिवंगत नेते प्रमोद महाजन हे भाजपा पक्षातील कधीकाळचं मोठं नाव होतं. मुळचे महाराष्ट्रातील असलेल्या प्रमोद महाजनांचे दिल्लीमध्ये मोठे प्रस्थ होते. भाजपामध्ये लालकृष्ण आडवाणी यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत प्रमोद महाजन यांना मानाचे स्थान होते. प्रमोद महाजन यांची 22 एप्रिल 2006 रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली होती. विशेष म्हणजे ही हत्या त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनीच केली होती. सकाळी 7.40 वाजताच्या दरम्यान प्रवीण महाजन यांनी स्वत:ची पिस्तुल काढून आपले मोठे बंधू प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात प्रमोद महाजन यांच्या छातीला तीन गोळ्या लागल्या होत्या.
हत्या करून पोलिसांसमोर समर्पण
प्रमोद महाजन यांची हत्या करून प्रवीण महाजन यांनी पोलिसासमोर आत्मसमर्पण केलं होतं. हातात पिस्तुल घेऊन प्रवीण महाजन पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पुढे 2007 साली मुंबईच्या सत्र न्यायालयाने प्रवीण महाजन यांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
गोळीबारात प्रमोद महाजन गंभीर जखमी
प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बडे नेते असल्यामुळे डॉक्टरांनीही त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात प्रमोद महाजन गंभीर जखमी झाले होते.
प्रवीण महाजन यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू
दरम्यान, या हत्याप्रकरणात दोषी ठरलेले आणि शिक्षा भोगत असलेल प्रवीण महाजन यांचा 3 मार्च 2010 रोजी मृत्यू झाला. मृत्यूच्या काही महिने अगोदर त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. तपासणीनंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा :
मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्याचा 'शिवा' नेमकं काय करतो?
मोठी बातमी! बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर