Aurangabad Cyber Crime : शेतकऱ्यांनो सावधान! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवर सायबर भामट्यांची नजर; ही बातमी वाचा
Aurangabad Cyber Crime : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं दिलेल्या रकमेवर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. मदतीची रक्कम वाढवून देण्याचं अमिष दाखवून हे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.
Aurangabad Cyber Crime : अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे सरकारने काही रक्कम शेतकऱ्यांना देऊ केली. मात्र याच मदतीवर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. मिळालेल्या मदतीची रक्कम वाढवून देतो असं आमिष दाखवत हे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या बँक खात्यासंदर्भातली माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असं आवाहन औरंगाबादच्या सायबर क्राईम ब्रँचनं केलं आहे.
सायबर भामट्यांची शेतकऱ्यांना मिळालेल्या अतिवृष्टीच्या मदतीवर नजर आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची वाढीव रक्कम देण्याचे अमिष दाखवून बँकेचे डिटेल घेतले जात असल्याचं सायबर क्राईम पोलिसांच्या समोर आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलेही बँकेचे डिटेल्स शेअर न करण्याचं आवाहन औरंगाबाद सायबर क्राईम ब्रांचच्या वतीनं करण्यात आलं आहे.
आधीच बळीराजा अतिवृष्टीमुळं हवालदिल झाला आहे. त्यात शासनानं तुटपुंजी मदत दिली आहे. यातून पुन्हा सावरण्यासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या रकमेतून रब्बीची पेरणी आणि खत बियाणं खरेदी करण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे. पण असा एखादा फोन आला आणि त्या भामट्यांचा आमिषाला शेतकरी बळी पडले, तर मात्र पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी? हे देखील सायबर क्राईमने सांगितलं आहे. एवढंच नाही तर वेगवेगळ्या विमा कवचाबाबतबी हे भामटे आपल्याला आश्वासन देऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो सावधान अन्यथा आपलं खातं रिकाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, असं आवाहन सायबर क्राईमनं बळीराजाला केली आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक उभा करण्यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागतात. बी-बियाण्यांसाठी पैसे कसे जमा केले जातात. त्यात अतिवृष्टीमुळे जोमात आलेल्या पिकाचं नुकसान होतं. याचं कसलंही सोयरसुतक या सायबर भामट्यांना नसल्याचं दिसून आलं आहे. त्यांची नजर असते ती खात्यातील रकमेवर. औरंगाबादेतील एका व्यक्तीच्या खात्यातील 19 रुपये देखील या भामट्यांनी सोडले नाहीत.
दरम्यान, आधीच अतिवृष्टीमुळे ऐन जोमात आलेलं पिक गेलं, यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या सायबर भामट्यांमुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच एबीपी माझाही शेतकऱ्यांना या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :