Amravati Violence : अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पुढील 2 दिवस बंदच; संचारबंदीत काही प्रमाणात शिथिलता
Amravati Violence : अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पुढील 2 दिवस बंदच राहणार असून संचारबंदीत मात्र काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
Amravati Violence : अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पुढचे 2 दिवस बंद राहणार आहे. तर पुढचे 5 ते 6 दिवस संचारबंदी कायम राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मात्र वेळ वाढवून मिळणार आहे. दरम्यान, अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटकेत असणारे भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.
त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी काल (मंगळवारी) सलग चौथ्या दिवशीही कायम होती. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. पण आता आणखी दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच शहरात उद्भवलेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. काल (मंगळवारपासून) शहरात संचारबंदीतून काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. आज दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती.
किरीट सोमय्यांच्या अमरावती दौऱ्यावर बंदी
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज (बुधवारी) अमरावती दौऱ्यावर जाणार होते. परंतु, त्यांच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलंय की, "आता ठाकरे सरकारने माझ्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे." तसेच, ट्वीट करताना किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्राची प्रत जोडली आहे.
अमरावती हिंसाचाराप्रकरणी अनिल बोंडेंना जामीन
माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होती.