सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचे आरोप जरांगेंनी फेटाळून लावले; म्हणाले, मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करू नयेत
Manoj Jarange : सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
जालना (आंतरवाली सराटी) : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड (Car Vandalized) करण्यात आली असून, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जबाबदार असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांचे सर्व आरोप मनोज जरांगे यांनी फेटाळून लावले आहे. सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही, मात्र, त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
सदावर्ते यांच्या आरोपाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, "नेमकं काय झालं आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही," असे जरांगे म्हणाले.
मराठ्यांचे मुलं मोठे होऊ द्यायचे नाहीत...
सरकार मराठ्यांच्या विरोधात काम करत आहेत. आरक्षणासाठी लागणारे सर्व काही निकष पार करून देखील मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. जाणूनबुजून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत नाही. आरक्षण दिल्यास मराठ्यांचे पोरं मोठे होतील असे त्यांना वाटत आहे. मराठा समाजातील तरुण मोठे होऊ नयेत यासाठीच जाणूनबुजून आरक्षण देण्यासाठी विरोध केला जात आहे. आमचे अर्धे भाऊ कुणबीमधून ओबीसी आरक्षणात आहेत. पण उरलेल्या अर्ध्या भावांना हे आरक्षण दिले जात नाही. गोडगोड बोलून सर्वच राजकीय पक्ष मराठ्यांचा फायदा घेऊन मोठे झाले आहेत. आम्हाला साथ द्या, सहकार्य करा असे पिढ्यानपिढ्या सुरु आहे. आता देखील तसेच करण्यात आले. एक महिन्याचा वेळ द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले. वेळ देऊन देखील आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे यांना आरक्षण द्यायचेच नसल्याचं जरांगे म्हणाले आहेत.
आजपासून कडक उपोषण...
दरम्यान यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी आपण पाणी घेतले होते. मात्र, आता आजपासून आपले कडक आमरण उपोषण असणार आहे. या काळात आपण पाण्याचा थेंब देखील पिणार नाही, असे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: