ठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकदीमुळे माझा पराभव निश्चित : अभिजीत बिचुकले
मात्र मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. निवडणुकीदरम्यान ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं.
मुंबई : वरळीमधून आदित्य ठाकरेविरोधात माझा पराभव होणार आहे, असं वक्तव्य मराठी बिग बॉसचे स्पर्धक आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे.
ठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकद यामुळे माझा पराभव निश्चित आहे. मात्र मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. एकीकड ठाकरे कुटुंबियांवर टीक करताना निवडणुकीदरम्यान ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असंही अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं. तसेच मुंबईकरांनी माझ्यावर खुप प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचा बिचुकलेंनी आभार मानले.
मी महाराष्ट्रातील स्टायलिश नेता आहे. मला फसवाफसवी जमत नाही. जे मी नेहमी कपडे घालतो, जसा राहतो म्हणून लोकांना मी त्यांच्यातला वाटतो. इतर नेते घरात वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात, मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना खादीचे सफेद कपडेच घालतात. यातून नेत्यांचा खोटेपणा उघड होतो, असं बिचुकलेंनी म्हटलं.
शरद पवारांनी हातवारे करुन मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचंही बिचुकलेंनी समर्थन केलं. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना चपराक दिली आहे, असं बिचुकले म्हणाले.
नेते मंडळी हे सर्वात मोठे अभिनेते असतात. सध्या उद्धव ठाकरे सर्वात मोठे अभिनेते आहेत. उद्धव ठाकरे 10 रुपयांच्या थाळीमध्ये काय देणार आहेत, हे मला पाहायचं आहे. तसेच आधीची झुणका भाकर केंद्रे कुठे गेली, असा प्रश्नही बिचुकलेंनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय करावं हेच उदयनराजे भोसले यांना माहित नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधातही बिचुकलेंनी अर्ज दाखल केला होता. इतकंच नव्हे तर त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढविली.