(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi wari 2023 : आळंदीत लाठीमार झाला नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका; राजीनाम्याची मागणी
आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांना लाठीमार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.
Ashadhi wari 2023 : आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांना लाठीमार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. सत्ताधारी पक्षाकडून लाठीमार नाही तर झटापट झाल्याचं सांगण्यात आलं तर विरोधकांनी या घटनेचा निषेध करत टीका केली आहे.
फडणवीसांकडून स्पष्टीकरण
'आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीमार झालेला नाही. आळंदीत झटापट आणि बाचाबाची झाली. व्हिडीओ बघितला तर त्यात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. लगेच सगळी परिस्थिती शांत झाली. मात्र काही राजकीय पक्षांना आवाहन आहे की, लोकांची आणि वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे या संदर्भात कोणीही राजकारण करु नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अजित पवार भडकले
फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले की, आळंदीत घडलेली घटना क्लेशदायक आहे. लाठीमार करणाऱ्या पोलिसांचा आणि सरकारचा तीव्र निषेध करतो. पालखीसारख्या सोहळ्यात अशा घटना अजिबात घडू नये. ही घटना चीड आणणारी आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो.
सरकारने राजीनामा द्यावा : नाना पटोले
वारकरी आणि पालखी परंपरेला संपवण्याचं जाती वादी सरकारने गालबोट लावण्याचं पाप केलं आहे. या सरकारचा धिक्कार करतो आणि सरकारमध्ये थोडी लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पोलिसांकडून स्पष्टीकरण...
त्यानंतर या प्रकरणासंदर्भात पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारचा लाठीमार नाही तर ही केवळ झटापट होती, असं त्यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं की, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही झटापट झाली आहे.