Ashadhi Wari 2022 : आज जेजुरीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला
Ashadhi Wari 2022 : सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.
Ashadhi Wari 2022 : सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात. त्यामुळे सासवड सोडताच येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष कानी पडत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल यवतमध्ये मुक्काम होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान ठेवेल त्यानंतर वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
केडगाव चौफुलावर कलावंतांकडून पालखीचं स्वागत
या एकूण मार्गामध्ये एक अनोखा योग या वारीत पाहायला मिळतो तो म्हणजे केडगाव चौफुलावर संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर या ठिकाणी तमाशा कलावंत महिला आपल्या अनोख्या पद्धतींना मनोभावे या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात.
माऊलीच्या पालखी मार्गातील दोन दिवसाचा विसावा पहिल्यांदा पुण्यात आणि त्यानंतर लगेच सासवडमध्ये होत असतो. सासवडमध्ये बंधू सोपान काकांच्या प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माऊलींचे प्रस्थान होत असतं. ऐतिहासिक आणि अध्यात्मिक पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवडमध्ये माऊलीला निरोप देताना माऊलीची पालखी ही जेजुरी नाक्यापर्यंत खांद्यावर आणण्याची प्रथा आहे. एकूण पालखी मार्गामध्ये माऊलीच्या प्रस्थानावेळी रथातच माऊलीला निरोप दिला जायचा. मात्र सासवडकर आपल्या खांद्यावरून माऊलींची पालखीचे प्रस्थान करतात. सासवडमध्ये पालखी खांद्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर पालखी गावच्या वेशीवर आणली आणि पुन्हा रथामध्ये ठेवली.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आता मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली आहे. सासवडहून निघालेल्या माऊलीच्या पालखी सोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचायला सुरू झालेले आहेत. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांना विस्तीर्ण असा पालखी मार्ग मिळाला. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना वारकरी मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या भेटीसाठी जणू आतुर झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
पंढरीत आहे रखुमाई, येथे म्हाळसा-बाणाई ।
तेथे विटेवरी उभा, इथे घोड्यावरी शोभा ।।
तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान ।
तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे ।।
तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा ।
तेथे मृदंग-वीणा-टाळ, येथे वाघ्या-मुरळीचा घोळ ।।
सासवडचा निरोप घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आता रस्त्यामध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. कधी डोक्यावर येणारे निरभ्र आकाश तर कधी मध्येच येणारे ढग. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबतच आता येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत दणाणून निघत आहे.
सासवडहुन निघालेला हा वैष्णवांचा मेळा आता सकाळी बोरावके मळा येथे पोहोचला. सासवड ते जेजुरी या मार्गातील हा पहिला न्याहारीचा विसावा. त्यानंतर दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वारकरी यमाई मंदिर परिसरामध्ये घटकाभर थांबतात. याच ठिकाणी माऊलींचे मानकरी आणि वारकऱ्यांना दुपारचे जेवण मिळते. तोपर्यंत तिकडं जेजुरी नगरीमध्ये सकाळ पासूनच वारकर्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी, राहण्याच्या व्यवस्थेसाठी जेजुरीतील अबालवृद्ध झटताना पाहायला मिळतायत..
अहं वाघ्या,सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी..
दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलीचा पालखी सोहळा जेजुरीकडे कूच करते. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबत येळकोट येळकोट जय मल्हार सुरू होतो. एकदा साकुर्डीचा टप्पा ओलांडला की खंडोबाच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी वायुवेगाने पावले टाकतात. अखंड लवथळेश्वर मंदिराजवळ पालखी पोहोचतातच या ठिकाणाहून मल्हारी मार्तंडाचा गड दिसला की येळकोट येळकोट जय मल्हारचा एकच जयघोष होतो.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचत आहेत. जेजुरीला भक्ताची कधीच वाणवा नाही. कारण वर्षभर या ना त्या कारणाने कायम जेजुरी खंडोबा भक्तांनी गजबजलेली असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकीची वारी करणारे वारकरी कधीच आपली वारी चुकू देत नाहीत. अगदी तसेच वर्षातून दोन वेळा मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाला भेटण्यासाठी सोमवती अमावस्येला राज्य आणि राज्याबाहेरून भक्त जेजुरीत येत असतात.. कडेपठार चढायला किमान दोन-अडीच तास लागतात तरीही यातील अनेक वारकरी हा डोंगर चढून जातात. खंडोबाच्या गडाला 380 पायऱ्या चढून वर चढणे म्हणजे दिव्यच.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेजुरी नगरीमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचणार आहे.. पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत होतं आहे. माऊलीच्या पालखी वर भंडारा उधळला गेल्यानंतर माऊलीची पालखी पिवळी होताना पाहायला पंचक्रोशीतील अबालवृद्ध या पालखी मार्गावर जमा झाले आहेत. सायंकाळी माऊली महाराजांची पालखी जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी आजचा या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.