(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Tree: रोग म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला! आंदोलन करतात म्हणून झाड तोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी निर्णय
Beed Tree: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून आंदोलक आंदोलन करतात म्हणून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट ते झाडच तोडून टाकल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे.
बीड: रोगापेक्षा इलाज भयंकर याचा प्रत्यय बीडमध्ये आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाकाय झाड प्रशासनाने केवळ त्या झाडावर लोक चढून आंदोलन करत आहेत म्हणून तोडून काढले. तर दुसऱ्या एका घटनेत बीड शहराला लागून असलेल्या पालवनच्या सह्याद्री देवराईमध्ये आग लागल्याने अनेक झाडे यात भस्मसात झाली.
रोगापेक्षा इलाज भयंकर कसा असतो हे नुकतेच बीडच्या जिल्हा प्रशासनाने दाखवून दिले आहे. त्याचं झालं असं की बीडचा कलेक्टर ऑफिस समोर एक कडुनिंबाचे झाड होतं. त्या झाडाखाली बसून अनेक आंदोलनकर्ते आंदोलन करायचे. बऱ्याच वेळा या झाडावर चढून आंदोलकांनी आंदोलन केली होती. या आंदोलकांची प्रशासनाला डोकेदुखी ठरत होती म्हणून प्रशासनाने चक्क झाड तोडून टाकले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे झाडाच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करताना यापूर्वी पाहायला मिळाले होते. मात्र त्यांच्याच प्रशासनातले अधिकारी असे झाडाच्या मुळावर मोठ्या चे चित्र बीडमध्ये पाहायला मिळतय.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारे लिंबाचं झाड प्रशासनाची डोके दुखी ठरत होती. आज अखेर या झाडावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. अचानक कारवाई केली जात असल्यानं वृक्ष प्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी याला रोखले होते. मात्र अखेर या झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. या झाडावर चढून अनेक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे ही कारवाई झाली आहे. याच कारवाईला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे.
प्रजासत्ताक दिनी या झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या कामगार महिलेला बोलण्यासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना झाडाखाली थांबून चर्चा करावी लागली होती. तर या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर हे आंदोलक महिला सोबत बोलले होते.
सह्याद्री देवराईला आग
बीड शहराजवळच्या पालवणच्या डोंगरा वर 207 हेक्टर क्षेत्रात सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून सह्याद्री देवराई प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. वन विभागाच्या वतीने मागच्या दोन वर्षापासून या याठिकाणी वृक्ष संवर्धनाचे मोठे काम झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
सह्याद्री देवराई या प्रकल्पामध्ये दीड लाखाहून अधिक वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि पटकथा लेखक अरविंद जगताप यांनीसुद्धा या सह्याद्री देवराई साकारण्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या ठिकाणीच पहिले-वृक्ष संमेलन सुद्धा भरले होते.
उंच डोंगरावर हिरवीगर्द झाडी आणि हिरवळ यामुळे या परिसरामध्ये फिरायला सहलीला वाढदिवस साजरा करायला अनेक लोक येतात. विशेषत: रोज सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली असते.
शनिवारी सायंकाळी सह्याद्री देवराई परिसरातील गवताने पेट घेतला. आग शमवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीन च्या माध्यमातून या ठिकाणी आग विझवण्यात आली. पण या आगीत छोटी झाडांचे मोठे नुकसान झालेय. मोठ्या झाडांना या आगीचा फारसा फटका जरी बसला नसला तरी या आगीमुळे सह्याद्री देवराईच्या या देखणे पणाला मोठा फटका बसला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहिली झाडाला श्रद्धांजली
बीडच्या कलेक्टर ऑफिस समोरच्या झाडावर आंदोलनकर्ते आंदोलन करतात म्हणून ते झाड तोडण्याचे संतापजनक काम बीड जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर आज वृक्ष मित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या तोडलेल्या झाडाला फुले वाहून वाहिली श्रद्धांजली.
या वेळी घेण्यात आलेल्या शोकसभेत जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. शासन आणि प्रशासनाच्या विरोधात मध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना साठी हे झाड सावली होत. अनेक आंदोलक कुणी टॉवरवर अथवा इमारतीवर चढून आंदोलन करतात, मग हे प्रशासन ते टॉवर सुद्धा पाडणार आहे का ? असा संतापजनक सवाल या वृक्षमित्रांनी केला.