रेड झोन वगळता अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
मुंबई-पुणे यांसारख्या तीव्र कोरोनाबाधित क्षेत्रांना वगळून इतर जिल्ह्यातील उद्योगांना काही नियंत्रणांसह उत्पादन सुरू करता येईल, यावर प्रस्ताव तयार करण्याची सूचना देसाई यांनी दिल्या आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्येनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृतिदलाची आज सोमवारी मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे यांसारख्या तीव्र कोरोनाबाधित क्षेत्रांना वगळून इतर जिल्ह्यातील उद्योगांना काही नियंत्रणांसह उत्पादन सुरू करता येईल, यावर प्रस्ताव तयार करण्याची सूचना देसाई यांनी दिल्या आहेत. विशेषत: शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल. कायमस्वरुपी तसेच कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात उत्पन्न मिळावे हा दृष्टीकोन प्राधान्याने पुढे ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यातआल्या. या प्रसंगी केंद्राकडे करावयाच्या मागण्यांवरही चर्चा झाली.
Health Minister | अत्यावश्यक सामान पुरवणाऱ्या ट्रकमधून वाहतुकीला परवानगी, ट्रकमध्ये चालक आणि वाहकालाच परवानगी
लघुउद्योगांना त्यांच्या कामगारांना किमान दोन महिने पगार देता यावा, यासाठी बँकांनी कर्जांची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, याबाबत केंद्र शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील यंत्रणांनी वीज आणि पाण्याच्या प्रत्यक्ष वापराचं बिल आकारावीत, एमआयडीसीने विकास कालावधी किमान तीन महिने विनाशुल्क वाढवून द्यावा या विषयी चर्चा करण्यात आली. वरील सर्व गोष्टींना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंजुरीनंतरच मान्यता देण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया
ग्रीन झोन : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
संबंधित बातम्या :