Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टाच्या कामकाजामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील चार महत्त्वपूर्ण याचिकांचा फैसला होणार आहे. त्यामुळे या निकालांचा परिणाम थेट निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो.

नवी दिल्ली : राजाच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या अडीच वर्षांमध्ये फुटलेले दोन राजकीय पक्ष आणि त्यानंतर झालेला राजकीय आणि न्यायालयीन पातळीवरील काथ्याकूट आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून (8 जुलै) कामकाज पुर्वत होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कामकाजामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील चार महत्त्वपूर्ण याचिकांचा फैसला होणार आहे. त्यामुळे या निकालांचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे राज्याचं संपूर्ण लक्ष आता सुप्रीम कोर्टात असणाऱ्या याचिकांवर असेल.
महाराष्ट्राच्या चार महत्त्वाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
- 12 जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत याचीकेवर सुनावणी
- 15 जुलैला शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी
- 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी
- 19 जुलैला राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबत होणार सुनावणी
यामध्ये शिवसेना कोणाची त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आणि चिन्ह या संदर्भातील सुद्धा सुनावणी होणार आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुद्धा आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सर्व याचिकांचा निर्णय जो काही निकाल असेल तो निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरगामी परिणाम करणार असेल. त्याचबरोबर गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भातील सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे. या याचिकांवर सुनावणी निश्चित झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातील याचिकांवर सुनावणी
12 जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातील याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे यासारख्या प्रमुख महानगरपालिकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ न शकल्याने गावगाडा पूर्णतः ठप्प झाला आहे. त्याचा मोठा परिणाम विकासकामांवर सुद्धा झाला आहे. दुसरीकडे 15 जुलै रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना परत शिवसेना नाव आणि चिन्ह मिळू शकते का? किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडेच शिवसेना चिन्ह आणि नाव कायम राहणार याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार जास्त असल्याने संख्याबळाचा विचार करून कोणता निर्णय दिला जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. हा निर्णय सुद्धा कोणाच्या बाजूने जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे संख्याबळाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे लक्ष आहे.
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधाती याचिकेवर सुनावणी
दरम्यान, आमदार अपात्रेचा मुद्दा सुद्धा राज्याचे राजकारणामध्ये चांगला चर्चिला गेला. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी एकही आमदार अपात्र न करण्याची किमया साधली होती. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या चार महत्त्वपूर्ण याचिकांमुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय लक्ष पुढील काही दिवस पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
