राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस? कुठं कुठं झालं जनजीवन विस्कळीत? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Maharashtra Rain Update News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Maharashtra Rain Update News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, पनवेल, नवी मुंबई परिसरात पावसानं कहर केला आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्यात कुठं कुठं मुसळधार पाऊस झाला आहे, त्याची सविस्तर माहिती पाहुयात.
मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, रेल्वे सेवेवर परिणाम
मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे. वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा आणि इतर रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण या परिसरात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे, तर काही ठिकाणी वाहनं वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
कोकणात मुसळधार पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातल्या प्रमुख आठ नद्यांपैकी केवळ दोनच नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. त्यापैकी खेडमधील जगबुडी आणि राजापूर मधील कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. विशेष बाब म्हणजे चिपळूण मधील वाशिष्टी नदीची पाणी पातळी देखील व्यवस्थित आहे. त्यामुळे चिपळूण शहराला कोणताही प्रकारचा धोका सध्यातरी नाही.
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा वेढा
बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र कमी अधिक मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खामगाव तालुक्यातील गारडगावाला नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
अकोला जिल्ह्यातही तुफान पाऊस
गेल्या 24 तासांपासून अकोल्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामूळे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. सध्या मोर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. मोर्णा नदीला आलेल्या पुरामूळे काठावरील लोकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस, गळाटी नदीला पुर, 5 गावांचा संपर्क तुटला
परभणीच्या पालम तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. यामुळं पालम ते जांभुळ बेट रस्त्यावर असलेल्या गळाटी नदीला पूर आला आहे. त्यामुळं या भागातील फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या पाच गावाचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने वेळेत काम न केल्याने ही स्थिती ओढवली आहे. तात्पुरता वाहतूक करण्यासाठी सिमेंट नळी टाकून तयार केलेला पुल पाण्याखाली गेला आहे. दिवस भर हा रस्ता वाहतूक करण्यासाठी बंद राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या: