Health Department : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवर पुण्यात गुन्हा नोंद, सायबर क्राईमकडून तपास सुरु
Health Department : आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड वर्गाच्या परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. आता आरोग्य विभागाकडून याबाबत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुणे : आरोग्य विभागाच्या 'गट ड' या वर्गासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सायबर क्राईम विभागाने दिली. आरोग्य विभागाच्या 'गट ड' परीक्षेचा पेपर परीक्षेआधी पेपर फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वीच गदारोळ झाला होता. ही परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा' कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांच्या परीक्षा न्यासा कंपनीच घेणार आहे. 28 नोव्हेंबरला 589 विद्यार्थ्यांची 11 संवर्गाची परीक्षा नाशिक, पुणे, लातूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.
गट क परीक्षेमध्येही गोंधळ
गेल्या महिन्यात, 24 ऑक्टोबरला गट 'क' साठी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या पदाच्या (संवर्गाच्या) प्रश्नपत्रिका मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचेही निर्दशनास आले होते. घडलेल्या या प्रकारानंतर 'न्यासा कम्युनिकेशन' यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट 'क' ची परीक्षा पुन्हा होणार आहे.
अशी होणार परीक्षा
या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची परीक्षा न घेता 40 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 50 मिनिटांचा वेळ असणार आहे. इतर 60 प्रश्न हे सर्व संवर्गासाठी सारखे असल्याने फक्त 40 गुणांची परीक्षा होणार आहे.
संबंधित बातम्या :