Health Department : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ कायम, मुंबई आणि भंडाऱ्यात पेपर फुटल्याचा आरोप
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा भोंगळ कारभार कायम सुरु असून काही ठिकाणी पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार आजही समोर आलेला आहे. आरोग्य विभाग गट ड च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना काल मध्यरात्री इंस्टाग्रामवर पेपर फुटल्याची माहितीही मिळालेली होती. त्यामुळे MPSC समनव्य समितीकडून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'ड' च्या परीक्षेसाठी सुमारे 4 लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्येही गोंधळ उडाला होता. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 4 होती, मात्र परीक्षा अडीच वाजता सुरु झाल्याचे समोर आले. भंडारा जिल्ह्यातील केंद्रावर 230 विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक देण्यात आलेले नव्हते. प्रवेशपत्रातल्या गोंधळामुळं अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. प्रवेशपत्रावर संबंधित परीक्षा केंद्राचा पत्ता असतानासुद्धा विद्यार्थ्यांचे नंबर त्या परीक्षा केंद्रावर नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मोहाडी सह काही केंद्रांवर सील नसलेल्या लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे गेल्या रविवारी गट क च्या परीक्षेवेळी झालेल्या गोंधळानंतरही आरोग्य विभाग न्यासा कंपनीने हलगर्जीपणा केल्याच पाहायला मिळत आहे.
गेल्या परीक्षेतही गोंधळ
गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर घोळ झाल्याचं समोर आलं होतं. पेपर मिळण्यात विलंब आणि आसन व्यवस्थेतील घोळावरुन पुण्यातील एका केंद्रावरही गोंधळ झाला होता. नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. गिरणारेच्या केबीएच महाविद्यालयातील केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. विदयार्थी जास्त आणि पेपर कमी आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान पुन्हा गोंधळ; मुंबई, पुणे, नाशिक केंद्रावर घोळ
- भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा
- Health Department Exam : आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ! तुमच्या प्रश्नांना संचालक डॉ. अर्चना पाटील यांची उत्तरे