(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान पुन्हा गोंधळ; मुंबई, पुणे, नाशिक केंद्रावर घोळ
Health Department Exam: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचं नाव घेईना. आज पुन्हा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
Health Department Exam: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचं नाव घेईना. आज पुन्हा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रावर घोळ झाला. त्यामुळे या अडचणींचा उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
पेपर मिळण्यात विलंब आणि आसनव्यवस्थेतील घोळावरुन पुण्यातील एका केंद्रावरही गोंधळ झाला. तर नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गिरणारेच्या केबीएच महाविद्यालयातील केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. विदयार्थी जास्त आणि पेपर कमी आल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय. 11 वाजून गेल्यानंतरही पेपर सुरू झाला नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ दिसत आहे. या परीक्षामध्ये दोन सत्रात पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही विद्यार्थ्यांना याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
याआधी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा परीक्षेवेळीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता. काही उमेदवरांना चुकीचे हॉल तिकीट मिळाले होते. परीक्षा केंद्राची कमतरता. उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षेतील गोंधळामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल जामर कुठे आहे..एकाच बेंचवर दोन दोन विद्यार्थी कसे...? कोल्हापूरला सकाळी पेपर अन् दुपारी औरंगाबाद... जायचं कसं? परीक्षाचं योग्य नियोजन करता येत नसेल तर परीक्षार्थींना तुमचं हेलिकॉप्टर द्या परीक्षा झाली की परत करतील.... अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
च्या आईचा घो...उद्या 24 ऑक्टोबरला कोल्हापूरला 10 ते 12 वाजता पेपर आहे अन 3 ते 5 ला औरंगाबादला पेपर आहे @rajeshtope11 साहेब तुम्हाला परीक्षाच योग्य नियोजन करता येत नसेल तर परीक्षार्थींना तुमचं हेलिकॉप्टर द्या परीक्षा झाली की परत करतील.@CMOMaharashtra #आरोग्यभरती pic.twitter.com/23PEus06hi
— कांबळे संदीप (@kamblesandeep12) October 23, 2021
मोठ्या मोठ्या बाता करणारे टोपे साहेब उत्तर द्या...मोबाईल जामर कुठे आहे..एकाच बेंचवर दोन दोन विद्यार्थी कसे...?@rajeshtope11 @Mpsc_Andolan@mipravindarekar @ShelarAshish@prachee_ps @PSamratSakal pic.twitter.com/kO3sBgStRg
— विश्वंभर🇮🇳 (@vishaSpeaks) October 24, 2021
राज्यात फक्त दोन ठिकाणी परिक्षेदरम्यान अडचण आली आहे एक पुणे आणि दुसरे नाशिक. पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेज मध्ये परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक वेळेवर पोहचले नाही, त्यामुळे पेपर द्यायला उशीर झाला. तर नाशिक च्या केबीएच हायस्कुल,गिरणारे येथे ऐनवेळी पेपर कमी पडले त्यामुळे काही विद्यार्थ्यांना उशिरा पेपर मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी गोंधळ करू नये किंवा संभ्रमात राहू नये ज्या विद्यार्थ्यांना उशिरा पेपर मिळाला त्यांना वेळ काढून दिला जाईल आणि पूर्णवेळ परीक्षा देता येईल, असं आरोग्य विभाग संचालक अर्चना पाटील यांनी सांगितलं.
आरोग्य विभागाच्या भरतीत परीक्षा केंद्रांना जॅमर....
लातुरात आज 39 केंद्रांवर परीक्षा सुरू झाल्या आहेत. लातूर विभागातील चार जिल्ह्यातून 19 हजारापेक्षा जास्त परीक्षार्थीनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लातूर शहरातील 39 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहेत. 'क' वर्ग पदासाठी ही लेखी परीक्षा होणार आहे. दोन सत्रात चालणाऱ्या परिक्षेसाठी लातूर आरोग्य मंडळातील लातूर ,उस्मानाबाद, नांदेड आणि बीड जिल्ह्यातून 19 हजार 140 उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या सर्व परीक्षा केंद्राच्या बाजूला जॅमर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक परिक्षार्थीचा व्हिडीओ केला जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवून आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना आरोग्य तपासणी केली जात आहे. मास्क अनिवार्य केला आहे.