Chandrakant Patil : शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंनी सर्वांना एकत्र बोलावून राजकीय धुळवड थांबवावी ; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना एकत्र बोलावून राज्यातील राजकीय धुळवड थांबवावी असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांना एकत्र बोलावून सध्या राज्यात सुरू असलेली चिखलफेक थांबवावी असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यभर आज धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या राज्यात सुरू असलेली राजकीय धुळवड थांबवावी असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात एबीपी माझासोबत संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न आहेत. महिलांवरील आत्याचार वाढत आहेत. परंतु, कोणाला अटक होत नाही. एसटी कामगारांचा प्रश्न सुटत नाही, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला जात नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींची काल राज्यभर भाजपकडून होळी करण्यात आली. धुळवडीनिमित्त एकमेकांवर रंग फेकले जातात. या रंग फेकाफेकीमध्ये आनंद असतो. परंतु, सध्या राज्यात एकमेकांवर करण्यात येत असलेल्या फेकाफेकींमुळे या राजकीय धुळवडीत आनंद नाही, तर प्रत्येकाला दुख: आहे. ही फेकाफेकी थांबवण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा याबाबत एकमत होत नाही. "
"तीन पक्ष एकत्र येवून सरकार स्थापन केल्यामुळे यांच्या डोक्यात हवा शिरली आहे. आधीच्या सरकारचे अनेक निर्णय या सरकारकडून रद्द केले जात आहेत. ही राजकीय धुळवड आनंदाची नाही तर दुख:ची आहे. राजकीय पक्षांनी बोलण्याची आणि वागण्याची संस्कृती बदलली पाहिजे. राज्यात पाच प्रमुख पक्ष आहेत. त्यांनी सर्वांनी एकत्र बसून एक राजकीय संस्कृती ठरवली पाहिजे. त्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने पुढाकार घ्यावा. किंवा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, हे राजू शेट्टी यांना आता माहित झाले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. राजू शेट्टी भाजसोबत आले तर आनंदच आहे.'
यासोबतच कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजप जिंकण्यासाठीच लढवेल असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत सत्यजीत कदम यांच्या उमेदवारीची शिफारस दिल्लीकडे करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसेचे दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीनेने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना उमेदवारी देऊ असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
"तुम्ही अजूनही साडेतीन जिल्ह्यातच..."; भाजपकडून शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर
Kolhapur By Election : करुणा शर्मा कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात! 'उत्तर'साठी भाजपचा उमेदवारही ठरला