Maharashtra CM : अमित शाहांसोबतची दिल्लीत 'महा'बैठक, शिंदे-दादा आणि फडणवीसांसाठी ही बैठक का महत्त्वाची होती?
Amit Shah Delhi Meeting : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली.
मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? उपमुख्यमंत्री किती असणार? मंत्रिमंडळ कसं असेल? शपथविधी कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहेत. कारण महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नावर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालंय. पण मुख्यमंत्रिपदाचा तो चेहरा कोण असेल, या सर्वांना उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे.
दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी दिल्लीत आणखी एक बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांशी चर्चा करण्यासाठी सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर हे सर्व नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी निघाले. त्याचदरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि थेट अमित शाहांची भेट घेतली.
दिल्लीतल्या बैठकीचा अजेंडा काय होता?
- मुख्यमंत्रिपदाच्या नावावार शिक्कामोर्तब.
- उपमुख्यमंत्री कोण कोण असणार यावर खल.
- शपथविधीची तारीख आणि ठिकाण यावर चर्चा.
- खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता.
- शपथविधी सोहळ्यात कोण कोण शपथ घेणार.
- मंत्रिमंडळातल्या संभाव्य नावांवर चर्चेची शक्यता.
अडीच वर्षांपूर्वी अचानक मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडलेल्या शिंदेंसाठी ही महाबैठक महत्वाची का आहे पाहुयात,
शिंदेंसाठी 'महा'बैठक महत्वाची का?
- मुख्यमंत्रीपद गेलं तरी महायुतीत महत्व कायम राखण्याचं आव्हान.
- नव्या सरकारमधील स्थान अधोरेखित झालं.
- राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळवण्याचे प्रयत्न.
- मोदींच्या मंत्रिमंडळातही कॅबिनेट मंत्रिपदासाठी आग्रही राहण्याची संधी.
- महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीतीवर चर्चा.
विधानसभेचा 23 तारखेला निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे कोण होणार मुख्यमंत्री आणि दुसरा सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे मुख्यमंत्रिपदी फडणवीस पुन्हा येतील?
भाजपसाठी 'महा'बैठक महत्वाची का?
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला.
- मुख्यमंत्री निवडीत मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याचा संदेश जाणार.
- महायुतीतील गैरसमज दूर करण्याची संधी.
- तिन्ही नेत्यांना थेट फीडबॅक देता येणार आणि फीडबॅक घेताही येणार.
- खातेवाटपावर चर्चा करुन निश्चित केली जाणार.
अजितदादांचा महायुतीतला प्रवास चढउतारांचा राहिला आहे. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांना सोबत घेणं ही चूक होती असं भाजपच्या गोटात बोललं गेलं. आता विधानसभेच्या निकालानंतर 'बरं झालं अजित पवार सोबत आहेत' असा सूर उमटताना दिसतोय.
राष्ट्रवादीसाठी 'महा'बैठक महत्वाची का?
- अजितदादांचं सरकारमधील स्थान अधोरेखित झालं.
- आपल्या पक्षातील नेत्यांसाठी चांगली खाती मिळवण्याची संधी.
- राज्यासोबत केंद्रातही मंत्रिमंडळात स्थान मिळणार.
- आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवता येणार.
- भविष्यात भाजपला राष्ट्रवादीची गरज का आहे हे ठसवता येणार.
ही बातमी वाचा: