(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक; मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा
अकोला राष्ट्रवादीतल्या वादाचा तिसरा अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते.
Akola NCP War: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी गंभीर आरोप केले आहेत. अकोला राष्ट्रवादीतल्या वादाचा तिसरा अंक सुरू झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावर आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी म्हटलं आहे की, आमदार मिटकरींचं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या एका महिलेचं प्रकरण निपटण्यात आलं. या प्रकरणात पाया पडणाऱ्या मिटकरींचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. आपल्यावर चारित्र्याचे आरोप करणाऱ्या मिटकरींनी त्याचे पुरावे द्यावेत. नाहीतर दहा दिवसांनंतर सर्व पुरावे आपण माध्यमांसमोर उघड करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, मिटकरींनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरण अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रूपये देऊन निपटवले. मिटकरींनी तीन दिवस अकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा सवालही त्यांनी केला आहे.
मिटकरींनी आपल्या चारित्र्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर भरचौकात फाशी घेईल
शिवा मोहोड यांनी मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केल्यानंतर आज 'माझा'कडे एक व्हॉट्सअॅप चॅटिंग उघड केलं. यात मिटकरींनी कमिशनचे 1 लाख परत केल्याचा दावा केला आहे. मिटकरींनी केशवनगरात घेतलेल्या 80 लाखांत घेतलेल्या भुखंडाचा स्त्रोत काय आहे?. 30 लाखांची फोरव्हिलर कुठून घेतली? असा सवाल करत मोहोड यांनी म्हटलं की, आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी महिलांविषयी वाईट नजर असलेल्या मिटकरींचा कडेलोट केला असता. मिटकरींनी आपल्या चारित्र्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर भरचौकात फाशी घेईल, असं देखील मोहोड यांनी म्हटलं आहे.
मिटकरींवर जयंत पाटलांसमोर कमिशनखोरीचे आरोप
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षाने थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोपही चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, अखेर याप्रकरणी मौन सोडत आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावले होते.
कोण आहेत आरोप करणारे शिवा मोहोड
शिवा मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अकोला महापालिकेतील माजी सभागृहनेते आहेत. कौलखेड आणि तुकारामचौक भागात त्यांची मोठी ताकद आहे. शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण अवताडे यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.
आरोप फेटाळत आमदार मिटकरींचा मोहोडांवर पलटवार
या आरोपांनंतर आमदार अमोल मिटकरी दोन दिवसांपासून शांत होते. मात्र, आज अखेर आपल्यावरील कमिशनखोरीच्या आरोपांवर आमदार अमोल मिटकरींनी मौन सोडलं. आपल्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनं केलेले कमिशनखोरीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. अकोल्यात 'एबीपी माझा'शी अमोल मिटकरींनी संवाद साधत आपलं मन मोकळं केलं आहे. आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं असा पलटवार यावेळी आमदार मिटकरींनी केला आहे. शिवा मोहोड यांच्यावरचे आरोप आणि गुन्हे तपासावेत. शिवा मोहोड यांचा विकासनिधीसाठी एकही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाहीय. त्यांनी त्यांच्याकडचा प्रस्ताव दाखवावा असं प्रतिआव्हानही यावेळी मिटकरींनी मोहोड यांना दिलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या