Amol Mitkari : निधीसाठी कमिशन घेतात? अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनं केलेले कमिशनखोरीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहत.
Amol Mitkari : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षानेच थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोपही चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे चार दिवसांपुर्वी पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, अखेर याप्रकरणी मौन सोडत आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावलेत.
'त्या' बैठकीत उडाली आरोपांची राळ :
28 ऑगस्टला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी मुर्तिजापूर येथेच पक्षाची एक आढावा बैठक घेतली होती. ही बैठक गाजली ती काही पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या गंभीर आरोपांनी.... या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी थेट आमदार मिटकरींच्या विरोधात तक्रारींच्या फैरी झाडल्यात. माजी नगरसेवक विशाल गावंडे यांनी आमदार अमोल मिटकरींनी स्वत:च्याच कुटासा गावात 15 कोटींचा विकासनिधी दिल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे आरोप केलेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडूनही कामासाठी कमिशन घेतल्याचा आरोप या व्हिडीओत करण्यात आलाय. व्हिडीओत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ शुटींग बंद करण्याची सुचना केल्याचं दिसतंय.
व्हिडीओ 'व्हायरल' झाल्याने खळबळ :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केलेल्या आरोपांचा 'तो' व्हिडीओ अचानक व्हायरल झाला आहे. या बैठकीत उपस्थित पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हा व्हिडीओ चित्रित केल्याचं बोललं जातंय. तेथूनच हा व्हिडीओ सर्वांकडे गेल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. हा व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागल्यावर 'त्या' बैठकीतील गरमा-गरमी बाहेर आली आहे.
कोण आहेत आरोप करणारे शिवा मोहोड :
1) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष.
2) अकोला महापालिकेतील माजी सभागृहनेते. कौलखेड आणि तुकारामचौक भागात मोठी ताकद.
3) शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण अवताडे यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या.
आरोप फेटाळत आमदार मिटकरींचा शिवा मोहोडांवर पलटवार :
या आरोपांनंतर आमदार अमोल मिटकरी दोन दिवसांपासून शांत होते. मात्र, आज अखेर आपल्यावरील कमिशनखोरीच्या आरोपांवर आमदार अमोल मिटकरींनी मौन सोडलं. आपल्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनं केलेले कमिशनखोरीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. अकोल्यात 'एबीपी माझा'शी अमोल मिटकरींनी संवाद साधत आपलं मन मोकळं केलं आहे. आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं असा पलटवार यावेळी आमदार मिटकरींनी केला आहे. शिवा मोहोड यांच्यावरचे आरोप आणि गुन्हे तपासावेत. शिवा मोहोड यांचा विकासनिधीसाठी एकही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाहीय. त्यांनी त्यांच्याकडचा प्रस्ताव दाखवावा असं प्रतिआव्हानही यावेळी मिटकरींनी मोहोड यांना दिलं आहे.
अकोल्यातील राष्ट्रवादीच्या काही प्रस्थांपितांकडून आपली कोंडी. आमदार मिटकरींचा खळबळजनक आरोप :
अकोल्यात पक्षातील काही प्रस्थापितांकडून आपली कोंडी होत असल्याचा खळबळजनक आरोपच आमदार अमोल मिटकरींनी केला अहे. या लोकांनी सातत्यानं आपला अपमान, अवहेलना आणि चारित्र्यहनन केल्याचं ते म्हणालेत. यासोबतच अनेकवेळा या लोकांनी धमक्या दिल्याचंही मिटकरी म्हणालेत. मात्र, आपलं म्हणनं पक्षाकडेच मांडणार असून पक्षानं दोषी आढळलो तर आपल्याला शिक्षा द्यावी, असंही मिटकरी म्हणालेत. आपण शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आणि जनतेला बांधिल. बुनबुडाचे आरोप करणाऱ्यांना फारसं महत्व देत नाहीय.
आरोप करणाऱ्यांचा बोलविता 'धनी' लवकरच उघड करणार : अमोल मिटकरी
पक्षातूनच आपल्यावर होत असलेल्या आरोपाचा बोलविता धनी कोण आहेय?, हे लवकरच माध्यमांसमोर उघड करणार असल्याचा इशाराच आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे. आमदार अमोल मिटकरींवर झालेले आरोप, त्यावर त्यांनी केलेला पलटवार आणि या अनुषंगानं अकोल्यातील पक्षातील प्रस्थापितांवर केलेले आरोप पुढच्या काळात कोणतं रूप धारण करतात हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.