राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद देण्यात येईल. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) राज्यात मोठा फटका बसला होता. राज्यातील 48 पैकी केवळ 17 जागांवरच महायुतीला विजय मिळवता आला. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली, तर शिंदेंच्या शिवसेना पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे, केंद्रातील एनडीए सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला एक मंत्रीपद देण्यात आले, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारने वेटींगवर ठेवले होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केंद्रातील मंत्रिपदाचा मार्गही मोकळा झाला आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेच्या वाटपात राज्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या वाट्याल जाणार आहे. त्यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती देण्यात येतील, असं समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. त्यासोबतच या दोन्ही पक्षांना केंद्रातही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद देण्यात येईल. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटालाही आणखी एक मंत्रिपद केंद्रात दिले जाणार आहे. त्यानुसार, खासदार श्रीकांत शिंदे हे मंत्री होतील, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यातील सत्तास्थापनेची आज महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत होत असून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार हे दिल्लीत आहेत. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत आज बैठक झाल्यानंतर रात्री 9 वाजता महायुतीच बैठक होणार असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडल्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातच, केंद्रातील भाजपकडून शिवसेना व राष्ट्रवादीला केंद्रात स्थान देऊन नाराजी दूर केली जाणार असल्याचे समजते.
महायुतीला राज्यात घवघवीत यश
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागांव विजय मिळाला आहे. त्यामुळे, या दोन्ही पक्षांतील प्रमुखांचा आत्मविश्वास वाढला आहे. तरीही, भाजपला 132 जागांवर यश मिळाल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे आता निश्चित मानलं जात आहे. त्यामुळेच, महायुतीमधील इतर दोन्ही पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची राज्यातील राजी-नारजाी दूर केली जाऊ शकते.
हेही वाचा
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या