Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Maharashtra Assembly Session : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार अनुपस्थित राहिले. त्यासंदर्भात कारण समोर आलं आहे.
नागपूर : मागील दोन दिवसांपासून विधिमंडळ कामकाजात सहभागी न होणारे अजित पवार बुधवारी विधिमंडळ कामजात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे ते अधिवेशनामध्ये सहभागी झाले नव्हते. अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आणइ मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. पण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात अजित पवार यांनी मात्र भाग घेतला नव्हता. या काळात अजितदादा दिल्लीला गेल्या असल्याची चर्चा सुरू होती. महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याच्या बातम्या या काळात येत होत्या. त्यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं ाहे.
अजितदादांना घशाचा संसर्ग झाल्यामुळे ते दोन दिवस अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. या काळात ते नागपूरमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानी आराम करत होते अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार हे दिल्लीला गेले असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नाराज भुजबळांचा अजितदादांवर हल्लाबोल
राज्याच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना डावलल्यानंतर ते नाराज झाले आणि त्यांनी अधिवेशन सोडून नाशिक गाठलं. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी शरद पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवारांसोबत असताना आपला मान राखला जायचा, आता अवहेलना वाट्याला आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. सकाळी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणाऱ्या भुजबळांनी दुपारी कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला. त्यात पुन्हा एकदा त्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली. 'कसला वादा अन् कसला दादा' असं म्हणत भुजबळांनी अजितदादांवरची नाराजी उघडपणे व्यक्त केली.
तर दुसरीकडे नाशिक आणि पुण्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या येवल्यातील संपर्क कार्यालयासमोर 'दादा उत्तर द्या' अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तर पुण्यात समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन कऱण्यात आलं. यावेळी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाच्या आंदोलन केलं.
ही बातमी वाचा: