फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेल्याने त्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुंबई : नागपुरात एकीकडे थंडीचा जोर वाढतोय, तर दुसरीकडे राजकीय वातावरण मात्र गरम आहे. विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. एक पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी दोघांमध्ये सात मिनिटांची चर्चाही झाली. मात्र या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन तर केलं मात्र या दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली? प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट नेमकं काय सांगते? दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगत होती? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विरोधी पक्षनेत्याचा दावा भक्कम केला का? अशा अनेक प्रश्नांवर राजकीय चर्चा सुरू झाल्या. या दोन नेत्यांच्या भेटीच्या दरम्यान आमदार सचिन अहिर उपस्थित होते. त्यांनी या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती एबीपी माझाला दिली.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या भेटीवेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते. ही भेट नियोजित नव्हती तर सहज घेतलेली होती असं सचिन अहिर यांनी सांगितलं. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर यावेळी काही चर्चा झाली नाही असंही सचिन अहिर म्हणाले.
सचिन अहिर म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट ही नियोजित नव्हती. ती सदिच्छा भेट होती आणि ती राजकीय संस्कृती दर्शवते. विरोधाला विरोध न करता पदाला मान देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ निघत नाही. राजकारणात अशा भेटी गाठी होत राहिल्या पाहिजेत. त्यामुळे राजकीय कटुता निर्माण होत नाही."
विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा नाही
राज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी जेवढे संख्याबळ लागते तेवढे संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे नाही. पण शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळावी यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट ही त्या संदर्भात होती का असे प्रश्न विचारले जात आहेत.
यावर बोलताना सचिन अहिर म्हणाले की, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांची आमची चर्चा झाली आहे. त्याचा कोणताही संदर्भ या ठिकाणी नाही.
राहुल नार्वेकर-ठाकरे भेट
फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. त्यावर नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंची केवळ सदिच्छा भेट होती असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. तर विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
ही बातमी वाचा: