(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय; कृषिमंत्र्यांकडून 524 कोटींचा आराखडा सादर करण्याच्या सूचना
Dhananjay Munde : चालू आर्थिक वर्षात 524.19 कोटी इतक्या निधीचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी सन 2022-23 ते सन 2024-25 या तीन वर्षांच्या कालावधीत 1 हजार कोटींची विशेष कृती योजना राबवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. दरम्यान, कापूस सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादनात आघाडीवर असलेले जिल्हे निवडून त्या जिल्ह्यांमध्ये हे सर्व कार्यक्रम युद्ध पातळीने राबवावेत. तसेच, या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 524.19 कोटी इतक्या निधीचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असून, या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.
कशी आहे योजना?
या योजनेअंतर्गत पिकांची उत्पादकता वाढ आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण तसेच मूल्य साखळी विकास या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये भुईमूग, करडई, जवस, तीळ, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, कार्यशाळा घेणे, विद्यापीठस्तरावरील संशोधन आणि बियाणे साखळी बळकटीकरण आणि आदर्श प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बळकटीकरण करणे, त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे बीज प्रक्रिया युनिट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक गट/कंपन्यांना ड्रोन खरेदी आणि ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान/अर्थसहाय्य देणे, शेतकऱ्यांच्या बांधांवर जैविक निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमोडिटी मार्केटशी जोडण्याकरिता अर्थसहाय्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
बैठकीत यांची उपस्थिती?
या बैठकीस कृषी आयुक्त सुनील चव्हाण संचालक विकास पाटील, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदास संशोधन केंद्राचे डॉ. मिलिंद देशमुख, जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, कृषी उपसंचालक शिवकुमार सदाफुले, डॉ. भरत वाघमोडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
मुंडे साहेब असं कसं? बैठकीत हारतुरे नाकारले, पण दुष्काळी बीडची सभा जल्लोषामुळे गाजली