Aditya Thackeray: अयोध्येत 'महाराष्ट्र सदन' बांधणार, मुंबई पालिकेतही रामराज्य येणार: आदित्य ठाकरे
Aditya Thackeray Ayodhya Visit: अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासबंधी उत्तर प्रदेश सरकारशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
अयोध्या: अयोध्येत आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी राजकीय विषय काढणं उचित नसेल. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला आम्ही राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचं ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असून ते श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय
दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. इथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
अयोध्यामध्ये महाराष्ट्र सदन उभारणार
अयोध्येत 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत अशी माहिती राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
राजकारणावर बोलणार नाही
आदित्य ठाकरे यांनी यावेळी कोणत्याही राजकीय विषयावर बोलण्याचे टाळले. आपण या ठिकाणी श्री रामाचे दर्शन घेण्यास आलो आहोत, राजकारणावर बोलणार नाही असं ते म्हणाले.
आमच्या भक्तीमध्येच आमची शक्ती आहे
शिवसेना या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आले आहे का या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे, त्यामुळे आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा व्हावी यासाठी प्रभू रामाकडे साकडं घालण्यासाठी आलो आहोत."
आदित्य ठाकरे हनुमान गढी, रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे.