Marathi School : अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? बच्चू कडूंचा सवाल
मुंबईत मराठी शाळांची संख्येत घट झाल्याचं 'एबीपी माझा'च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा उद्विग्न सवाल केला आहे.
मुंबई : अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? असा उद्विग्न सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विचारला आहे. मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल असंही ते म्हणाले.
मुंबईत मराठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री बच्चू कडूंनी वास्तवावर बोट ठेवलं असून समाजव्यवस्थेवर आणि काही सवाल विचारले आहेत. बच्चू कडू म्हणाले की, "मराठी पत्रकारांनी किती अग्रलेख मराठीवर लिहिलेत? किती अधिकारी, राजकारण्यांनी आपली पोरं मराठीत शिकवलेत. राजकारणी भाषणं करतात मराठीवर बोलतात मात्र आपली पोरं इंग्रजी शाळेत शिकवतात. ही सत्य परिस्थिती आहे. आता गरीबाच्या पोराला देखील अक्कल आली आहे. श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावं आणि आम्ही का घालावं मराठीत? गरीबांनी देखील त्यांचं अनुकरण करणं सुरु केलंय."
बच्चू कडू म्हणाले की, "देशात भ्रम आहे. इंग्रजीत शाळेत गेला की तो हुशार. ब्रिटनमध्ये सगळेच इंग्रजी बोलतात मग काय सगळेच हुशार आहेत का? तिथेही पागलांची भर्ती आहे. हा भ्रम कमी करण्याची गरज. मराठी शाळेला सोन्याची झळाळी जरी लावली तरी लोकांची मानसिकता ही आहे की पोरगं इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे. मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधरवण्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि नेत्यांची मानसिकता बदलवण्याची गरज आहे. यासाठी कठोर निर्णय आणि त्याग करावा लागेल. हे कुठेच दिसत नाही. नुसते पैसे ओतून नाही चालणार."
मोठे नेते, अधिकारी, पत्रकारांनी सुरुवात करावी की माझा मुलगा मराठीतच शिकणार. शिक्षण मशीन झाली आहे. टॉप शाळा तर मुलगाही टॉप ही प्रवृत्ती चुकीची आहे असं बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, "आधी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नेत्याचं, अधिकाऱ्याचं पोरगं, श्रीमंताचं पोरगं एकत्र शाळेत शिकायचं. बऱ्या प्रमाणात शिक्षणाची समानता होती. आता काय झालं आम्ही वेगवेगळी व्यवस्था करुन ठेवली. गावातली शाळा आता अपंग, मजूर, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शोषितांसाठी ठेवण्यात आली. अशा पालकांचं वजन गावावर नाही, त्यामुळे शिक्षक आणि प्रशासन बिनधास्त आहे. शिक्षण खात्यातला शिक्षक फक्त बाकी आहे. यातलं शिक्षण आणि विद्यार्थी दोघंही गेलेत."
नुसतं आवाहन नको, कृती करावी
बच्चू कडू म्हणाले की, "नेत्यांना आवाहन करुन चालणार नाही. मराठीचं प्रेम भाषणातून नाही तर कृतीतून पाहिजे. सर्व गावातील लोकांनी ठरवलं की पोरं जि.प शाळेतच शिकेल. तर लोकं देखील जाईल. पण 20 टक्के लोकं हे ठरवू शकत नाही. त्यामुळेच सर्व अडचण आहे. गरीबाला कळलं आहे आपल्याला भाषा आणि जातीच्या नावावर मूर्ख बनवलं जातं आहे."
जागतिक पातळीवर मी कसा टिकणार यासाठी माय मराठी पायाखाली गेली तरी चालेल पण डोक्यावर इंग्रजीचं पुस्तक असलं पाहिजे. आधी हे श्रीमंतांना वाटत होतं आता गरीबाला देखील वाटतं. त्यात काय नवल आहे? असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या :
- Marathi School : हिंदी, उर्दू, इंग्रजी शाळांच्या संख्येत वाढ, मराठी शाळा वाचवा, 'माझा'ची मोहीम
- ...तर 2027 पर्यंत मुंबईत एकही मराठी शाळा नसणार; भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- मुंबई महापालिकेचा अजब कारभार, मराठी शाळेत शिकले म्हणून पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली