Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
Jayant Patil: शेकापमधील अनेक मोठे नेते येत्या काही दिवसांत भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. तर पक्षातील अंतर्गत धुसफूस याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
अलिबाग : शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) पक्षात सध्या अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा आहेत. रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) फुट लवकरच फुट पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या शेकाप पक्षामध्ये असलेल्या एकाधिकारशाहीला कंटाळून पाटील कुटुंबातला एक गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ‘शेकाप’चे माजी जिल्हा चिटणीस आणि मीनाक्षी पाटील यांचे चिंरजीव आस्वाद पाटील (Aswad Patil), माजी आमदार सुभाष पाटील यांचे चिरंजीव सवाई पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसांत भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. तर पक्षातील अंतर्गत धुसफूस याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
‘शेकाप’च्या अधिवेशनामध्ये या वादाची ठिणगी
मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबातील वाद आता समोर येताना दिसत आहेत. पंढरपूर मध्ये पार पडलेल्या ‘शेकाप’च्या अधिवेशनामध्ये या वादाची ठिणगी पडल्याचं पहायला मिळालं. पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या नियुक्तीवरून सुभाष पाटील यांनी पक्षातील मनमानी कारभाराबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी सुभाष पाटील यांना अलिबागमधून उमेदवारी नाकारण्यात आली. जिल्हा चिटणीसांना डाववत जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना अलिबागमधून उमेदवारी दिली.
जिल्हा चिटणीसपदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
त्यानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस दिसून आली, विधानसभा निवडणुकीनंतर आस्वाद पाटील (Aswad Patil) यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करत जिल्हा चिटणीसपदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर ‘शेकाप’चे माजी आमदार आणि भाजपचे राज्यसभेतील विद्यामान खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमाणे आस्वाद पाटील (Aswad Patil) यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. लवकरच ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आस्वाद पाटील (Aswad Patil) यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देणारे बॅनर
त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर आस्वाद पाटील (Aswad Patil) यांनी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत, त्याच बरोबर समाज माध्यमांवरही पोस्ट टाकून रविंद्र चव्हाण यांचे आस्वाद पाटील (Aswad Patil) यांनी अभिनंदन केले आहे. माजी आमदार सुभाष पाटील यांचे चिंरजीव सवाई पाटील आणि सुमना पाटील यांनीही रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे हे नेते भाजपशी जवळीक साधत असल्याची आणि लवकरच जयंत पाटलांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.