Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
Beed News: वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मकोका लागल्याने वाल्मिक कराडची सुटका अवघड
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील (Beed News) वातावरण तापले आहे. काल परळीत वाल्मिक कराडविरोधातील (Walmik Karad) कारवाईनंतर पडसाद उमटले होते. आज दुसऱ्या दिवशीही परळीत (Parli News) तणावपूर्ण शांतता आहे. या अशांततेचे लोण आता केजमध्येही पसरले आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केज न्यायालयाबाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांनी वकिलांनाही कोर्टात जाण्यास मनाई केली. त्यामुळे वकील प्रचंड संतापले.
पोलिसांनी गेटवर अडवल्यानंतर केज कोर्टातील वकील प्रचंड संतापले. कोर्टात जाताना तपासणी होत असल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. आम्ही काहीही केले नाही. मग आमची तपासणी आणि आम्हाला का अडवले जाते. कोणत्याही वकिलाला थांबवायचे नाही. अन्यथा वातावरण वेगळं होईल, असा इशारा एका वकिलाने पोलिसांना दिला. पोलीस (Beed Police) आणि वकिलांच्या या बाचाबाचीमुळे केज न्यायालयाच्या आवारात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वकिलांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. मात्र, अद्याप ही पोलिसांकडून केज न्यायालयात येणाऱ्या लोकांची तपासणी आणि चौकशी सुरूच आहे.
बीडच्या पांगरी गावात तरुण टॉवरवर चढले
वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर वाल्मिक कराडच्या मूळगावी पांगरीत पाच तरुण टॉवरमध्ये चढले आहेत. हे तरुण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. वाल्मीक कराडवर राजकीय आणि जातीय द्वेषातून कारवाई झाल्या असल्याचा आरोप ही नागरिक करत आहेत. पांगरी गावातील पुरुष महिला एकत्रित येऊन वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत.
वाल्मिक कराडला केज ऐवजी बीड न्यायालयात नेणार
वाल्मिक कराडला आज सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला बीड न्यायालयात नेण्यात येऊ शकते. सुरक्षेच्या कारणास्तव केज कोर्टाऐवजी बीडच्या कोर्टात सुनावणी घेण्याची सीआयडीची मागणी आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?