मुंबई महापालिकेचा अजब कारभार, मराठी शाळेत शिकले म्हणून पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली
मराठी शाळेत शिकलेल्या उमेदवारांना नोकरी नाकारल्याचा मुंबई महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. पात्र झालेल्या उमेदवारांना नोकरीपासून डावलण्यात आलं आहे.
मुंबई : मराठी शाळेत शिकले म्हणून मुंबई महापालिकेनेच नोकरी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांची नेमणूक डावलली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मुंबई महापालिका शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमांतून शिक्षक म्हणून निवडल्या गेलेल्या 102 शिक्षकांची नेमणूक रखडली. पवित्र पोर्टलद्वारे 2017 च्या डिसेंबर महिन्यात शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठीही निवड करण्यात आली. मात्र परीक्षेत पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना त्यांचे दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण मराठीत असल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही, असं अजब कारण शिक्षण विभागाने दिलं आहे.
विशेष म्हणजे या डावलण्यात आलेल्या 102 शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणि कायद्यानुसार मान्य करण्यात आले आहे. किंबहुना तो अधिकार प्रत्येक नागरिकाचा आहे. मात्र प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यामुळे पात्र उमेदवारांची नेमणूक रखडवली जात आहे, हे चिंताजनक आहे.
याउलट ज्या उमेदवारांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेय त्यांची ताबडतोब नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी शाळा वाचवा असं म्हणणाऱ्यांनीच मराठी शाळांचा गळा घोटायला सुरुवात केली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांना मुलांना इंग्रजी शिकवता आलं पाहिजे. मात्र केवळ दहावी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे, म्हणून पात्र उमेदवारांना डावलनं योग्य नाही. या प्रकरणात आम्ही लक्ष घालू, असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
मुंबई महापालिकेच डोकं ठिकाण्यावर आहे का?
मुंबई महापालिकेच डोकं ठिकाण्यावर आहे का? अनेक शास्त्रज्ञ आणि दिग्गज मंडळी आपल्या मातृभाषेत शिकले आहेत. मुंबई महापालिकेच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही. मराठी शाळेतून शिकलेल्या पात्र उमदेवारांना डावललं गेलं तर ही भरतीच आम्ही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसेच्या अभिजीत पानसे यांनी दिली आहे.