Municipal Corporation Election Reservation 2022 : राज्यातील 14 मनपांसाठी प्रभाग आरक्षण जाहीर, त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे अनेकांना दिलासा
राजधानी मुंबईसह राज्यातील 14 महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले. जवळपास सर्वंच महापालिकांमध्ये एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Municipal Corporation Election Reservation 2022 : राजधानी मुंबईसह राज्यातील 14 महानगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले. जवळपास सर्वंच महापालिकांमध्ये एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निश्चित झालेल्या आरक्षणानुसार अनेक उमेदवारांना ठरवून निवडणूक लढवता येईल.सर्वच महापालिकांमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे सर्वच मनपांच्या प्रभागामध्ये 50 टक्के महिला दिसतील.
राज्यात मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यामुळे नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस होता. मात्र, झालेली प्रभाग रचना पाहता अनेकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले, मंगेश सातमकर, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. काही वॉर्डमधील आरक्षणामुळे ही काही विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे. महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित झाले आहेत. मुंबईत यंदा 9 प्रभागांची वाढ होऊन 227 वरून 236 प्रभाग झाले आहेत.आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील 24 प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई मनपा आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेची ही सहावी निवडणूक आहे.पहिल्यांदाच पॅनल पध्दतीने निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षातील दिग्गजांना दिलासा मिळाला आहे.एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा कुणालाही फटका बसलेला नाही.122 जागापैकी 3 जागांचे प्रभाग 40 तर दोन जागांचे प्रभाग 1 आहे.महिला वर्गासाठी 50 टक्के जागा आरक्षित असल्याने 61 पेक्षा जास्त महिला सभागृहात जाणार आहेत.अनुसूचित जातीसाठी 11 ,अनुसूचित जमाती 2,सर्वसाधारणसाठी 109 जागा आरक्षित आहेत.
नागपूर
नागपूर महापालिकेच्या आरक्षणामुळे अनेक प्रभाग रचना आणि वॉर्ड रचनेत बदल झाल्यानं अनेकांची अडचण झाली आहे. नागपूर महापालिकेत 52 प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.चार ऐवजी तीन वॉर्डचा प्रभाग झाल्याने ही संख्या 38 वरुन 52 वर पोहोचल आहे, तर वॉर्ड 151 वरुन 156 झाले आहेत.
उल्हासनगर
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1 तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 36 जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेच्या टाऊन हॉल मध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून चिट्टी काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती तसेच सर्वसाधारण महिला खुला वर्ग असे मिळून एकूण 30 प्रभागांमधून 15 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला नगरसेविका निवडून जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये या आरक्षणामुळे दिग्गजांना यामध्ये कुठेही फटका बसलेला नाही.
सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक 2022 अनुषंगाने आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या 57 पैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 1 जागा अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात तर उर्वरीत 48 जागा ह्या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवकांची संख्या 139 असून एकूण 46 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी 22 पैकी 11 महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीसाठी 3 पैकी 2 महिला असतील. सर्वसाधारणमध्ये 114 पैकी 57 महिला असतील.
वसई विरार
वसई विरार शहर महानगरापालिकेच्या 2022 साठी आरक्षणाची सोडत आज विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आलं आहे.
महानगरपालिकेच्या एकूण 42 प्रभागात 126 सदस्य निवडून येणार आहेत. यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय 42 प्रभागात त्रिसदस्यी प्रभाग रचना असल्याने प्रत्येक वॉर्डमध्ये एक किंवा दोन महिला आणि एक किंवा दोन पुरुष आहेत. यंदाची आरक्षण सोडत कुणालाही चिंतेत टाकणारी नसली तरी काहींना फटका बसला आहे.
नाशिक
१. महापालिका निवडणुकीत यंदा 133 जागांसाठी 67 जागा या महिलांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव तर अनुसूचित जमातीसाठी 10 जागा राखीव आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला राखीव आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या सर्व 31 प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 1 महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 46 जागा महिलांसाठी राखीव असतील.
पुणे
पुणे महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याल आली.पुण्यात एकुण 58 प्रभाग आहेत.या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडत पार पडली. महिलांसाठी 74 प्रभाग राखीव आहेत.
ठाणे
ठाणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईसह 14 महानगरपालिकांची आरक्षण सोडत जाहिर झाली आहे. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जारी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेत अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग आणि महिलांसाठी दोन प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
ठाण्याची एकुण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जाती लोकसंख्या (SC) 1 लाख 26 हजार एवढी असून त्यांच्यासाठी 142 जागा आरक्षित ठेवण्यात आलं आहेत. तर महिलांसाठी 5 जागा राखीव असणार आहेत. ठाण्यातील अनुसूचित जमाती लोकसंख्या 42 हजार 698 आहे. त्यांच्यासाठी 3 प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून 2 प्रभाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
कल्याण डोंबिवली
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने पार पडणार आहे. तीनपैकी एक प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. परिणामी अनेक मातब्बरांच्या जागा सुरक्षित राहिल्य आहेत. आज जाहीर झालेल्या सोडतीत अनुसूचित जाती,जमाती आणि महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन वर्षापासून प्रलंबित आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 44 वॉर्डमधून 133 जागांसाठी या निवडणूक होणार आहे. यातील 58 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 7 जागा अनुसूचित जाती तर 2 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर 6 जागा अनुसूचित जातींसाठी, तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून 58 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
अकोला
अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे.मात्र नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना काहीसा फटका बसला आहे. अकोल्याच्या भाजप महापौर अर्चना मसने,उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत. भाजपचे सभागृह नेते राहुल देशमुखांचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
अमरावती
अमरावती शहरात एकूण 33 प्रभाग असून त्यापैकी 32 प्रभागांत तीन नगरसेवक तर एका प्रभागांत दोन नगरसेवक असतील. एकूण 98 नगरसेवक मनपा आमसभेत निवडून जाणार असून त्यापैकी 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत.
एकूण 98 सदस्यां पैकी 17 जागा अनुसूचित जातीसाठी, तर 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यात एससी महिलांसाठी 9 तर एसटी महिलांसाठी 1 जागा आरक्षित आहे. सर्वसाधारण महिलांसाठी एकूण 39 जागा आरक्षित असून त्यापैकी 30 जागा राज्य निवडणूक आयोगाद्वारे थेट आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 9 जागा सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या