एक्स्प्लोर
Advertisement
महाबीजचा शेतकऱ्यांना दणका, बियाण्यांची 50 टक्के दरवाढ
अकोलाः शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे. पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या या महामंडळाने यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.
बाजारात सर्वच खाजगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांत दरवाढ केली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्याऐवजी सरकार शेतकऱ्यांकडूनच नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांमधून या भाववाढीचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पीक विम्याआधी बियाण्यांची दरवाढ
मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याला केलेला खर्च देखील निघाला नव्हता. शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा देखील अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. राज्यासाठी मंजूर झालेल्या पीक विम्याचं वाटप अनेक ठिकाणी अजून चालूच आहे.
सरकारने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना युद्ध पातळीवर पीक विमा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याऐवजी महाबीज या सरकारी संस्थेने संधीचं सोनं करण्याचे प्रयत्न सुरु केलं आहेत.
डाळीचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांचा यावर्षी तूर, उडीद, मूग अशा डाळवर्गीय पिकांकडे कल आहे. मात्र बाजारात डाळवर्गीय बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे महाबीजने शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बियाण्यांमध्ये झालेली दरवाढः
सोयाबीनः सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. जेएस-335 या वाणाची 30 किलोची किंमत पूर्वी 1875 रुपये होती तर आता ती 2040 रुपये आहे. सोयाबीनच्या जेएस-9305 या वाणामध्येही 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय इतर वाणांची देखील दरवाढ करण्यात आली आहे.
मूगः मूगाच्या जवळपास सर्वच वाणांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. कोपरगाव वाणाच्या किंमतीत किलोमागे 75 रुपयांची वाढ केली आहे, तर उत्कर्ष वाणाच्या 5 किलोमागे 300 रुपये दरवाढ केली आहे.
उडीदः उडीदाच्या टीएयू-1 या वाणाच्या 5 किलोमागे 600 रुपये दरवाढ केली आहे.
तूरः डाळीच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी यावर्षी तूर पिकाकडे वळल्यामुळे तुरीच्या बियाण्यांचा बाजारात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तुरीचा आयसीपी 8863 हा वाण प्रति किलो 80 रुपयांनी महागला आहे. तर बीडीएन 708 हा वाण प्रति दोन किलोमागे 190 रुपयांनी महागला आहे.
हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बळीराजा खरीप हंगामासाठी पावसाची अतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा खर्च देखील निघालेला नाही. त्यातच महाबीजने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement