(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET Paper Leak Case: लातूर पॅटर्नची देशभर चर्चा, जिथं शैक्षणिक प्रयोगाची बिजं रोवली तिथंच काळिमा फासणाऱ्या कृत्याचे धागेदोरे, गावकऱ्यांची खंत
NEET Paper Leak Case: ज्या गावानं लातूर पॅटर्न घडवला, त्याच गावातील शाळेतल्या शिक्षकानं लातूर पॅटर्नलाच काळिमा फासला; कातपूरच्या स्थानिकांची खंत
Latur NEET Exam Paper Leak Case: लातूर : नीट पेपरफुटीमुळे (NEET Paper Leak Case) संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. या पेपरफुटीचं (Paper Leak Case) कनेक्शन थेट महाराष्ट्रातल्या (Maharashtra News) लातूरपर्यंत (Latur) येऊन पोहोचलं आहे. या प्रकरणात दिवसागणिक नवनवीन धक्कादायक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच या प्रकरणामुळे देशभरात गाजलेल्या लातूर पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच ज्या गावातील लोकांनी लातूर पॅटर्न निर्माण करण्यात योगदान दिलंय, त्याच गावातील शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकानं लातूर पॅटर्नला काळिमा फासण्याचं काम केलंय, अशी खंत कातपूरमधील नागरिक आणि शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
जलीलखाँ पठाण हा कातपूर मधल्या जिल्हा परिषदेत शाळेत मुख्याध्यापक होता. 1949 साली ही शाळा सुरू झालेली, ही शाळा या परिसरातील सर्वात जुनी शाळा आहे. याच शाळेतून शिकून अनेक प्राध्यापक इंजिनिअर डॉक्टर तयार झाले. कातपूर मधील अनेकांनी लातूर पॅटर्न निर्माण करण्यात योगदान दिलं आहे. त्यात स्वर्गीय भाऊसाहेब देशमुख जे शाहू महाविद्यालयाचे कोषाध्यक्ष होते. आणि माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी 30-35 वर्ष प्रचंड मेहनत केली होती. तशीच मेहनत लातूरमधील अनेक महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लासेस यांनी केली होती. मात्र कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक असलेल्या जलीलखाँ पठाण याचा नीट पेपर फुटीत समावेश असल्याची बातमी आल्यानं कातपूर येथील नागरिकांना आणि या शाळेतील शिक्षकांना जबर धक्का बसला आहे.
जलीलखाँ पठाण कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 2017 पासून मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. पहिली ते आठवी असलेले या शाळेत सात शिक्षक आहेत. एमएबीएड शिक्षण झालेल्या जलीलखाँ पठाणबाबत अनेक वंदता आहेत. त्याची पीएचडी झालेली आहे. तो खाजगी कोचिंग क्लासेस घेतो, अशी माहिती येथील शिक्षकांना कळाल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शाळेतील आपलं काम झाल्यानंतर तू लातूरला निघून जायचा. शालेय समितीतील लोक असतील, पालक असतील किंवा सहकारी शिक्षक असतील यांच्याशी तो फक्त शाळेच्या कामाबाबतच बोलत असे, असं मत शाळेतील नवनियुक्त मुख्याध्यापक नवनाथ चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण निलंबित
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलीलखाँ पठाण यावर जिल्हा परिषदेनं निलंबनाची कारवाई केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. जलीलखा पठाण हा लातूर जिल्ह्यातील कातपर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता, असं निलंबन आदेशात म्हटलं आहे. आरोपी मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई आणि अनास्था दिसून आली आहे.
शांत आणि मितभाषा असणाऱ्या जलील पठाण यानं असलं कृत्य केल्यामुळे या शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि शिक्षक आणि ग्रामस्थ यांना धक्का बसला आहे. ज्या गावात लातूर पॅटर्नच नाव उज्वल करणाऱ्या लोकांची चर्चा होते, तिथे आता जलील पठाण यांच्या अपप्रवृत्ती आणि दुष्पर्त्याची चर्चाही होणारच आहे, अशी खंत येथील स्थानिक व्यक्त करतात.