लातूरमध्ये मनपाची परवानगी न घेताच झाडं तोडणे पडले महागात, महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल
ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्यासाठी झाड तोडल्याची माहिती आहे. लातूर शहरातील लातूर अर्बन बँकेजवळ 50 फूट उंचीचे एक अशोकाचे झाड होते.
लातूर : लातूरमध्ये (Latur News) परवानगी न घेताच झाड तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्यासाठी झाड तोडल्याची माहिती आहे. लातूर शहरातील लातूर अर्बन बँकेजवळ 50 फूट उंचीचे एक अशोकाचे झाड होते. साधारण 10 वर्ष जुने हे झाड आहे. तुळशीराम दादाराव कराड यांनी कोणास न विचारता,मनपाची पूर्वपरवानगी न घेता हे झाड तोडले. ही बाब लक्षात आल्यानंतर मनपामार्फत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन,संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतुदीनुसार कराड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे. शहरातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. शहर आणि परिसरातील कोणतीही झाडे तोडू नयेत. अत्यावश्यक असल्यास झाडे तोडण्यासंदर्भात मनपाकडे अर्ज करावा. महानगरपालिकेने परवानगी दिली तरच झाड तोडावे. परवानगी न घेता झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यास दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी दिला आहे.
लातूर शहरातील अनेक भागात कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनेकदा झाडे तोडण्यात आली आहेत. याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने वेळोवेळी दोषींवर एक लाख रुपये आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही अनेक वेळेस असे गुन्हे वारंवार केले जात आहेत. परवानगी न घेता झाडे तोडणाऱ्या दोषींवर वचक बसावा यासाठी मोठा आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष यासारख्या पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थेने केली आहे.
एमएसईबीची डीपी शिफ्ट करण्यासाठी वृक्ष तोडणयात आल्याची माहिती समोर आली आहे. एमएसईबीने मनपाकडे कोणताही अर्ज केला नव्हता. झाड तोडण्याची परवानगी कराड यांनी मागितली होती.मात्र मनपाने झाड तोडण्याबाबतची परवानगी दिली नाही.तरीही झाड तोडण्यात आलं आहे. डीपीसाठी काम सुरू झाले आहे.पोल टाकले होते. झाड तोडल्याचं मनपाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डीपी शिफ्टिंगच काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मनपा उद्यान विभाग प्रमुख समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.
या प्रकारावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे.कारण डीपी शिफ्ट करण्याची परवानगी त्यांनी घेतली नाही. झाड तोडण्याबाबतचा विनंती अर्ज मनपाकडे केला नाही. असे असतानाही ज्या तत्परतेने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकार माहीत असताना पोल उभे केले आहेत .त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मनपा आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनागोंदी कारभार केला होता मात्र वृक्ष प्रेमीच्या सजगतेमुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे.