Year Ender 2022 : चळवळीचा लढवय्या महामेरु हरपला, राज्यसभा निवडणुकीने दिल्लीपर्यंत चर्चा! सरत्या वर्षाला निरोप देताना कोल्हापुरात काय काय घडलं?
एकंदरीत पाहता 2022 हे अनेक घटनांनी स्मरणात राहील यामध्ये शंका नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा 2022 हे वर्षे चांगलेच वादळी ठरले. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होईल अशा एकापेक्षा एक घटना घडामोडी घडल्या.
Year Ender 2022 : बघता बघता 2022 वर्षाची आज अखेर होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीने बऱ्याच घटना मानवी जीवनाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण मानव जातीवर उद्भवले होते त्या संकटाला मागे सारण्यात चालू वर्षात यश आलं असलं, तरी या जाता जाता पुन्हा एकदा संकटाने चाहूल दिली आहे.
एकंदरीत पाहता 2022 हे अनेक घटनांनी स्मरणात राहील यामध्ये शंका नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा 2022 हे वर्षे चांगलेच वादळी ठरले. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होईल अशा एकापेक्षा एक घटना घडामोडी घडल्या. संभाजीराजे यांच्या निवडणुकीवरून झालेलं रणकंदन, चळवळीचा महामेरून प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन, जयप्रभा स्टुडिओची झालेली विक्री आणि त्यानंतर सुरु असलेला जनआक्रोश, कोल्हापूर विमानतळाचा होत असलेल्या विकास, 429 ग्रामपंचायतींचे कारभारी निवडताना झालेली टोकाची चुरस, फुटबाॅल वर्ल्डकपमुळे कोल्हापुरात दिसून आलेली ईर्ष्या, आणि कोल्हापूर फुटबाॅल हंगामाच्या सुरुवातीलाच झालेली हाणामारी अशा विविध कारणांनी कोल्हापूरचे राजकारण तसेच समाजकारण ढवळून निघाले. मात्र, राज्यसभा निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण सर्वाधिक ढवळून निघाले. यानंतर शिवसेनेत बंडाळी होऊन दोन गट पडले. याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले.
हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी नगरसेवक, नावाच्या साधर्म्यातून झालेली एटीएसची कारवाई यामुळेही चांगलीच चर्चा झाली. जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये 14 वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधवच्या कामगिरीने सुद्धा सर्वांनीच प्रभावित केले. देशातून एकमेव निवड झालेल्या कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवला विम्बल्डनमध्ये पराभव स्वीकारावा लागला, असला तरी पण आत्मविश्वास तिचा चांगलाच दुणावला. दुसरीकडे, कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी करून दाखवली.
प्रा. एन.डी.पाटील यांच्या निधनाने चळवळीला धक्का
शेतकरी, कामगार कष्टकरी, महिला यांच्यासह शोषितांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या एन. डी. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरला जबर धक्का बसला. 17 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचा बुलंद आवाजा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त झाली.
जयप्रभा स्टुडिओ विक्री
मराठी चित्रपटसृष्टीत कोल्हापूरचे अतुलनीय योगदान आहे. या योगदानातील कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर येताच चांगलाच जनआक्रोश झाला. याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. साखळी उपोषण करून न्याय मिळत नसल्याने काहींनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्टुडिओचा व्यवहार झाल्याची माहिती 11 फेब्रुवारी रोजी समोर आली. यामध्ये 15 फेब्रुवारी 2020 मध्येच जयप्रभा स्टुडिओची जागा तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले. 6 कोटी 50 लाखांना हा व्यवहार झाला.
राज्यसभा निवडणुकीने जिल्ह्यात रणकंदन
संभाजीराजे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली नाही. यानंतर त्यांनी सर्वपक्षीयांनी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने शिवसेनं मोठा डाव टाकताना कोल्हापूरच्याच निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या संजय पवार यांना उमेदवारी दिली. यामुळे अनेक प्रत्यारोप झाले.
अखेर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनाही समोर येऊन बाजू स्पष्ट करावी लागली. या निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव झाला. भाजपनेही सहाव्या जागेसाठी कोणतेही संख्याबळ नसताना खासदारकीसाठी धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले. या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. त्यामुळे महाडिक गटाला अनेक पराभवांनंतर विजयाची चव चाखता आली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून वातावरण चांगलेच ढवळून निघाले. आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असताना भाजपने ही पार प्रतिष्ठेची करून टाकल्याने चांगलीच चर्चा झाली. शिवसेनेनं आपला परंपरागत मतदारसंघ असतानाही काँग्रेसला पाठिंबा देत महाविकास आघाडीचा धर्म पाळला. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव विजयी झाल्या. मात्र, भाजपकडून सत्यजित कदम यांना मिळालेल्या मतांची सुद्धा चांगलीच चर्चा झाली.
लोकराजा शाहूंसाठी 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतीशताब्दी वर्ष कोल्हापूरमध्ये विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले. शाहूंच्या दुरदृष्टीतील ठेवा असलेल्या शाहू मिलमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. समस्त कोल्हापूरकरांनी 100 सेकंद स्तब्ध लोकराजाचे अभिवादन केले.
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मैदान मारले
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावत 21 वर्षांचा दुष्काळ संपवला. पृथ्वीराजने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत कर अवघ्या 22 व्या वर्षी त्याने हा किताब पटकावून अखंड कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
हेरवाडचा विधवा प्रथा बंदी पॅटर्न
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा बंदीचा पॅटर्न कोल्हापूरच्या पुरोगामी वाटचालीत आणखी एक आदर्श घालून दिला. विधवा महिलांना सन्मानाने वागवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी अनुकरण केले. राज्य सरकारनेही प्रत्येक ग्रामपंचायतने अनुकरण करण्याचे आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या