(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhairyasheel Mane meets Eknath Shinde : शिवसैनिकांचा घरावर मोर्चा सुरु असताना धैर्यशील माने दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवसैनिकांचा घरावर मोर्चा सुरु असताना धैर्यशील माने दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले. पंचगंगा प्रदूषण, पूरपरिस्थिती, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी त्यांनी भेट घेतली.
Dhairyasheel Mane meet Eknath Shinde : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला आहे. मात्र, खासदार धैर्यशील माने दिल्लीत आहेत. शिवसैनिकांचा घरावर मोर्चा सुरु असताना धैर्यशील माने दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंचगंगा प्रदूषण, पूरपरिस्थिती, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
शिवसैनिकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला
जयसिंगपुरात शिवसेना मोर्चावेळी जोरदार राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यानजीक पोलिसांनी शिवसैनिकांचा मोर्चा अडवण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या मारताना घराकडे जाणारच, अशी भूमिका घेतली.
त्यामुळे पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे तसेच संजय पवार यांना ताब्यात घेतले. मोर्चाला हजारो शिवसैनिकांसह महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी धैर्यशील माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गली गली मै शोर है माने चोर है अशाही घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
माने गटाची दोनवेळा गद्दारी
मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले. जाधव म्हणाले की, माने गटाने दोनवेळा गद्दारी केली. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नसल्याचे ते म्हणाले.
सांगा ओ खासदार उद्धव साहेबांचं काय चुकलं?
शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घराती भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशी विचारणा शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट
- Dhairyasheel Mane : माने गटाची दोनवेळा गद्दारी, लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली, शिवसेनेचा धैर्यशील मानेंवर हल्लाबोल!
- Dhairyasheel Mane : उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं, पुत्रवत प्रेम दिलं, विजयासाठी रान केलं, मग धैर्यशील माने सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?