Kolhapur News: कोल्हापुरात महिलेशी वादातून भररस्त्यात कोयता नाचवला अन् पोलिसांनी तिथंच नेत गुडघ्यावर वाकवत मस्ती जिरवली
Kolhapur News: कोल्हापूरमध्ये महिलेशी वादानंतर भररस्त्यावर कोयता नाचवणाऱ्या तरुणांची मस्ती पोलिसांनी जिरवली; करवीर पोलिसांची तत्काळ कारवाई.

Kolhapur News: महिलेशी झालेल्या वादानंतर भर रस्त्यामध्ये कोयता नाचवणाऱ्या पाच जणांची कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police Action 2025) चांगलीच मस्ती जिरवली आहे. ज्या ठिकाणी कोयत्याने (Kolhapur Koyata Case) दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी त्यांना गुडघ्यावर बसवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. करवीर पोलिसांनी कोयता नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल (Kolhapur Viral Video) झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना त्याच ठिकाणी नेत चांगलाच दणका दिला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मारहाणीनंतर कस्तुरी जाधव या महिलेनं करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. यानंतर उत्कर्ष सचिन जाधव, अभिषेक उर्फ अभ्या विनय पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हर्षवर्धन शरद सुतार, अनुराग उर्फ टेड्या जयसिंग निमन आणि प्रथमेश भीमराव कांबळे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
रस्त्यावर कोयता नाचवत दहशत निर्माण केली (Kolhapur Crime)
आरोपी उत्कर्षचा कस्तुरी जाधव या महिलेसोबत वाद झाला होता. ही महिला मंगळवारी सायंकाळी मित्रासोबत पन्हाळा रोडवर चिखली फाटानजीक एका हॉटेलजवळ थांबली होती. यावेळी उत्कर्ष आणि अभिषेक या दोघांनी कस्तुरीच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मित्र जखमी झाला. यानंतर इतर तिघांनी रस्त्यावर कोयता नाचवत दहशत निर्माण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना दणका दिला. पोलिसांनी त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दहशती निर्माण करणारा कोयता कोल्हापूरमध्ये चांगलाच चर्चेत आहे. दिवसाढवळ्या शहराच्या उपनगरांमध्ये कोयता नाचवून दहशत निर्माण केली जात आहे. किरकोळ वादातूनही खुनी हल्ले होत आहेत. त्यामुळे कोयत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींची जागेवर मस्ती जिरवली.
पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना दम (Kolhapur latest crime updates)
दुसरीकडे, गेल्या दहा वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी हजेरी घेतली. दोन दिवसांपूर्वी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयात 104 गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांना कडक शब्दात समज देण्यात आली. यापुढे गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपअधीक्षक पाटील यांनी गुन्हेगारांना दिला. आगामी निवडणुकांमध्ये सराईत गुन्हेगारांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हजर करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या
























