Dhairyasheel Mane : उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं, पुत्रवत प्रेम दिलं, विजयासाठी रान केलं, मग धैर्यशील माने सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?
खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानावर शिवसैनिकांचा आज मोर्चा धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली आहे.
Dhairyasheel Mane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यतील शिवसेनेलाही अभूतपूर्व खिंडार पडले आहे. बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर त्याचबरोबर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी आमदार राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील दोन खासदारांनी पण बंड करत एकनाथ शिंदे यांचा घरोबा मान्य केला आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानावर शिवसैनिकांचा आज मोर्चा धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू केली आहे. सदर मोर्चा शाहू सांस्कृतिक भवन,मार्केट यार्ड,कोल्हापूर येथून छ. संभाजी महाराज पुतळा,रुईकर कॉलनी मार्गे धैर्यशील माने यांच्या कार्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे.
मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती शिवसैनिकांनी केली आहे. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घराती भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशी विचारणा शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केली आहे.
मोर्चाला विरोध करू नका, खासदार मानेंकडून आवाहन
बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियातून केलं आहे. धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडताना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये.
मोर्चामध्ये सहभागी होणारा प्रत्येकजण हे आपलेच बंधू-भगिनी आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देमं हे त्यांचा सहकारी म्हणून माझं कर्तव्य असल्याचे धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. मी शिवसैनिकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे त्यांनी आपल्या सगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे.